पवारांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यात गैर काय- मुलायम

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधानपदासाठी प्रसंगी शरद पवार यांनाही समर्थन देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका मुलाखतीत पवारांचे तोंडभरुन कौतुक करताना मुलायम यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

’पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा कोणीही बाळगू शकतो. जर शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यात गैर काय? ते एक यशस्वी नेते आहेत. मंत्री म्हणूनही त्यांचा अनुभव मोठा आहे. राहिला प्रश्‍न त्यांना समर्थन देण्याचा. तो निर्णय सपा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याआधारे घेईल, असे मुलायम यांनी सांगितले आहे.

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा कौल देशाचे नेतृत्व ठरवण्यात नेहमीच निर्णायक ठरला आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करता या राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाचे दिल्लीतील वजन प्रचंड वाढले आहे. त्याबरोबर मुलायम यांच्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुलायम हे स्वत: पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे बोलले जाते मात्र, प्रत्यक्षात त्याबाबत गोलमाल उत्तर देताना मुलायम यांनी ’आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेकांना धक्का दिला आहे. एकीकडे शरद पवार यांचे नाव घेताना मुलायम यांनी स्वत:च्या नावावर काहीच स्पष्ट भुमिका मांडली नाही. तुम्ही पंतप्रधानपदावर दावा करणार का?, असे विचारले असता दिल्लीत कोणाचेही सरकार बनू देत, त्यात समाजवादी पक्षाची भुमिका महत्वाची राहील, असा आमचा प्रयत्न असेल, असे मुलायम म्हणाले.

1996 मध्ये शिजलेल्या तिसर्‍या आघाडीत मुलायम यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले होते. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी त्याच्या नावाला विरोध केला होता. याबाबत विचारले असता लालूंचे नाव न घेता तीन-चार लोकांनी तेव्हा खोडा घातला होता, असे मुलायम यांनी मान्य केले. मुलायम यांनी अयोध्येत करसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश द्यावे लागल्याची सल आजही आपल्य मनात असल्याचे या मुलाखतीत सांगितले.
ते म्हणाले, ’2 नोव्हेंबर 1990 रोजी भाजपने 11 लाख करसेवकांची गर्दी अयोध्येत जमा केली होती. तेव्हा मंदिर की मशीद यापेक्षा देशाची एकता अबाधित राखण्याचे आव्हान त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर होते. त्यामुळेच शांतता प्रस्थापीत करण्यासाठी गोळी चालवावी लागली. तेव्हाच्या परीस्थितीत गोळीबाराचे आदेश देण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता, मात्र या गोळीबाराची खंत नेहमीच राहणार आहे.’

सीबीआयच्या भीतीपोटी मुलायम यांनी काँग्रेसला समर्थन कायम ठेवल्याचा आरोप नेहमीच होतो. याबाबत विचारले असता त्यात काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी
सांगितले. ’मी जेलमध्ये जायला घाबरत नाही. मी अनेकदा जेलमध्ये गेलो. मला त्याची कुणी भीती दाखवण्याचे कारण नाही’, असे सांगताना ’जे पक्ष जेलची
भीती दाखवून राजकारण करतात त्यांचा खात्मा झाल्याशिवाय राहणार नाही’, असे सूचक विधानही त्यांनी केले.

देशात गुजरातचे नाही तर उत्तर प्रदेशच्या विकासाचेच मॉडेल चालेल, असा टोला त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात नरेंद्र मोदी यांना लगावला.

Leave a Comment