काँग्रेसने संपविला द.महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा जनाधार

गेल्या बारावर्षात दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने उभे केलेले आव्हान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षांच्या अथक परिश्रमांनी लीलया आटोक्यात आणले आहे. तीन वर्षापूर्वी जेंव्हा पृथ्वीराज बाबांनी महाराष्ट्रातची सत्ता हाती घेतली तेंव्हा त्यांचाच मतदारसंघ असलेल्या सातारा, सांगली भागात जनाधार नव्हता आणि जो विरोधात पक्ष होता तो सत्तेतील मित्रपक्ष होता. तरीही हा बदल त्यांनी करून दाखविला, हाच असा सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा संदेश आहे. तेथे पूर्णपणे बहुमतात असलेली राष्ट्रवादीची आघाडी तेथे पराभूत तर झालीच पण काँग्रेसला चाळीस जागा मिळून निर्णायक बहुमत आणि राष्दवादीला फक्त चौदा जागा अशी स्थिती झाली.

यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील आव्हान एखाट्या राजू शेट्टी यांनीज आटोक्यात आणले होते तर सातारा जिल्ह्यात छत्रपती उदयन राजे हे राष्ट्रवादीचे असूनही ते राष्ट्रवादीलाच आव्हान बनले असल्याची टिपणी त्या पक्षाचे लोकच करताना दिसत होते. तरीही दक्षिण महाराष्ट्रात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीला मिळालेले अपयश आणि काँग्रेसचे यश यावर अजून त्या त्या पक्षाचाही विश्वास बसलेला नाही.त्याच प्रमाणे गेल्या वीस वर्षात सेनेने बर्‍यापैकी बळ जमविले असतानाही त्यांना व मनसेला खातेही खोलता आले नाही. भाजपाने आपली मर्यादित स्थिती कायम ठेवली.या निवडणुकीत जरी पक्षांच्या बलाबलात फरक झाला असला तरीही नेहेमीच्या ठोकताळे पद्धतीने या निकालांचा विचार करून चालणार नाही. कारण पुढील वर्षीच्या सर्वसाधारण निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने एक धक्कादायक प्रयोग केला आणि त्यासाठी सर्व शक्तीही पणाला लावली पण तो फसल्यामुळे राज्यातील त्या पक्षाचे लोक अधिक काळजी घेतील, अशी वस्तुस्थिती आहे.

सत्तेवर येताना खबरदारीचा उपाय म्हणून कोणताही राजकीय पक्ष पहिल्यांदा अनेक पक्षांशी युती वा आघाडी करत असतो. राष्ट्रवादी हा तसा दहा बारा वर्षापूर्वीचाच पक्ष असल्याने गेल्या निवडणुकीत त्यांनी अनेक पक्षांची आघाडी व युती केली. राज्यात व केंद्रात राष्ट्रीय कॉग्रेसशी युती हा त्यातीलच प्रकार होता. त्याचाच भाग म्हणून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सांगलीमिरजेत काँग्रेसला फटकारून भाजपा, समाजवादी यांच्याशी आघाडी केली होती. अर्थात ही आघाडी ही स्थानिक स्वरुपाची असते.त्यामुळे त्या त्या पक्षाची राष्ट्रीय धोरणे, परराष्ट्र धोरण यांच्याशी त्यांचा संबंध नसतो. त्याच्या आधीच्या पाच वर्षांच्या काळात कोणत्या तरी पक्षाच्या नगरसेवकाने काही कामे नीट न केल्याचा परिणाम म्हणून अन्य सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येवून संघटितपणे विरोध करतात त्यातीलच हा प्रकार होता. पण त्या आघाडीला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्यातून छत्तीस जागा मिळाल्या म्हणजे अपक्षांच्या मदतीने निर्णायक बहुमतही झाले. पण पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यात आपल्या स्वत:च्या हिंमतीवर सत्तेत येवू शकतो का हे तपासण्याचा धाडसी निर्णय त्या पक्षाने घेतला. त्यासाठी तयारीही बर्‍यापैकी केली. स्वत: शरदराव यांनी दोन दिवस मोडून पक्षाच्या सार्‍या नेत्यांना आपली सारी शक्ती सांगली मिरजेत पणाला लावण्यास सांगितले.

दुसर्‍या कोणत्याही म्हणजे गेली दहा वर्षे केद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसशीही हातमिळवणी करायची नाही, असे ठाम ठरविले. हे करताना कोणावरही टीका टिपणी करायची नाही, हे सूत्रही पाळले. पण निवडणुकीपूर्वी दोन महिने राष्ट्रवादीने सुरु केलेल्या या विशेष मोहिमीची जाणीव काँग्रेसला झाली व त्यांनीही मग नेटाने कामाला आरंभ केला. एक म्हणजे पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम आणि वसंतदादा यांचा नातू प्रतीक पाटील यांच्यासारख्या काँग्रेसच्या पुढील पिढीतील वाद संपविले. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील शिवाजीराव देशमुख अशा गेल्य पिढीतील नेत्यांनाही या निवडणुकीत सहभागी केले.
पक्षांचे सुंदोपसुंदीचे राजकारण आणि प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न यात जर जनतेचे प्रश्न नीट सोडविले गेले असतील तर सामान्य जनतेचा काही आक्षेप नसतो. पण सांगली मिरज भागात रस्ते, पाणी वीज याबाबत कोणतीही परिस्थिती सुधारली नसल्याने लोकांचा राग होताच. कॉग्रेसला यावेळी फक्त राष्ट्रवादीवर टीकाच करायची होती. कारण गेल्या पाच वर्षाच्या कारभाराच्या कोणत्याही परिणामाला राष्ट्रवादीच जबाबदार होता. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने त्या पक्षाच्या नगरसेवकांना न आवडलेली बाब म्हणजे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सत्ताबाह्य स्वरुपाची अनेक केंद्रे करून ठेवली होती.

सारे निर्णय मुंबईत होत आणि महापालिका आयुक्तही आठवड्यातील दोन दिवस मुंबईतच असायचे .‘आपण पक्षासाठी केंद्रातून व राज्यातून सहाशे कोटी रुपये आणले, अशी घोषणा जयंत पाटील यांनी वारंवार केली पण प्रत्यक्षात फारसे काही सांगलीपर्यंत आले नाही. त्या शहरातील सर्वसाधारण कुटुंबाला पाणी पट्टी व घरपट्टी मिळून एक हजार रुपयांच्या घरात भरावी लागत असे. तरीही तेथील लोकांना अधिक मनाला लागलेली बाब म्हणजे चार वर्षापूर्वीच्या जातीय दंगलीत जो मुख्य आरोपी होता त्यालाच तिकिट दिले गेले. त्याच प्रमाणे गुन्हेगारी व दादागिरी यांची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना तिकीट दिले. त्यातच तेथील महापौरांच्या मुलाचे शाही विवाहाचे प्रकरण गाजले. त्यात त्या महापौरांना पक्षांतून काढून टाकण्यात आले पण त्यामुळे नाराज झालेल्यांनी पक्षाला मदतीऐवजी व्याप होईल, अशी भूमिका घेतली.

हा सारा प्रचार आपापल्या वकुबानुसार चालला असताना अचानक काँगे्रसचे प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे काँग्रेसप्रवेशासाठी नेहेमीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न करत असतात अशी माहिती दिली. त्यामुळे जेवढी पक्षकार्यकर्त्यांची चलबिचल व्हायची तेंवढी झाली पण परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी खास कुमक म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रिंगणात उतरले आणि दोन महिन्यापूर्वी ‘मी वाईट बोलणार नाही’ अशी ज्या आणभाका घेतल्या होत्या त्या तात्पुरत्या बाजूला ठेवून त्यांनी पतंगराव व नारायणराव राणे यांच्याबरच बरसले. ‘भारती विद्यापीठासाठी तुम्ही कोणाच्या, किती व कशा जमिनी लाटल्या आहेत ते जर सातबार्‍यानिशी पुढे आले तर पंचाईत होईल, असा वाक् वाण सोडला तर मुंबईतील चेंबूर उपनगरात अशाच एकाला पोलिसांनी टायरमध्ये घेऊन मारले होते अशीही कथा सांगितली. तर नारायण राणे यंानीही अजितदादांचे भ्रष्टाचार यावरील त्यांची सीडी वाजवून दाखविली. यामुळे मतदारांचे मनोरंजन होण्यापलिकडे काही घडले नाही. कारण मी अशा लोकांसोबत कधी बसणारही नाही, अशी घोषणा करणारे आर आर आबा नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकत्रच होते व ‘झाले गेले विसरून जा’ अशीच सगळ्यांची मानसिकता होती.
अशा या सर्वच आघाड्यावर गाजलेल्या निवडणुकीतील एक बाब खाली शिल्लक राहाते ती ही की, राष्ट्रवादीचा जनाधार येवढा कमी झाला आहे, याची कल्पना त्या पक्षाला शेवटपर्यंत आलीच नाही. त्याच वेळी पुण्यातील महापालिका वार्डाच्या एका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा एक उमेद्वार पराभूत झाला.तो पराभव किरकोळ असता तर गोष्ट निराळी पण त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. ही बाब पक्षनेत्यांना जिव्हारी लागली आहे. त्या पक्षाला जमिनीवरील परिस्थिती कळली नाही की, गेल्या पाच वर्षातील पाटबंधारे प्रकरण, राज्यसहकारी बँक प्रकरण अशी जी आठ दहा मोठी प्रकरणे बाहेर आली त्याचा परिणाम झाला याचाही अंदाज त्या पक्षाला अजून आलेला नाही. ज्या पश्चिममहाराष्ट्राच्या पाठिंब्यावर तो पक्ष उभा आहे त्या पक्षाचा जनाधार संपत चालला आहे असाच त्याचा निष्कर्ष निघतो.

Leave a Comment