तेलंगणाबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनात

नवी दिल्ली – स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दयावर काँग्रेस कोअर समितीची विशेष बैठक शुक्रवारी झाली. आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहूल गांधी उपस्थित होते.

यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी, उपमुख्यमंत्री दामोदर रंजनारसिंम्हा आणि पीसीसी अध्यक्ष बोस्ता सत्यनारायण यांनी तेलंगणाच्या मुद्दयावर आपली भूमिका मांडली.बैठकीनंतर यासंदर्भातला निर्णय सध्यातरी गुलदस्त्यात ठेवण्यात येणार आहे. मात्र आगामी पावसाळी अधिवेशादरम्यान अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दयावरून काँग्रेसमध्ये्च दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी यांना विभाजन नको आहे. तर सत्यनारायण तेलंगणाचा भाग आंध्रप्रदेशचा भाग वेगळा करण्यावर ठाम आहेत. आंध्र प्रदेशच्या एका विद्यार्थी संघटनेनेही राज्यव्यापी बंद पुकारला आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करुन तेलंगणाची निर्मिती करावी अशी या संघटनेची मागणी आहे. त्यामुळे आगामी काळात स्वतंत्र तेलंगणाचा मुद़दा जोर धरू लागला आहे. यावर लवकर निर्णय न घेतल्यास याचा फटका आगामी निवडणूकीत कॉग्रेसला बसण्याची शक्यता आहे.