बोधगया स्फोटाची जबाबदारी आयएमने स्वीकारली

नवी दिल्ली : गेल्या रविवारी बिहारच्या बोधगया येथील महाबोधी मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून संदेश ट्विट करून या संघटनेने बोधगयेतले स्फोट आपणच केले असल्याचे जाहीर केले आहे. या संघटनेने हा संदेश कॅनडातील एका अकौंटवरून पाठविला असल्याचे दिसत आहे. परंतु या घटनेचा तपास करणार्‍या एनआयए या संस्थेने या अकौंटची अधिक तपासणी केली जाईल असे म्हटले आहे.

बोधगया येथे झालेले ९ स्फोट आपणच घडवले आहेत असे इंडियन मुजाहिद्दीनने आपल्या संदेशात म्हटले आहे. याच संघटनेने बिहारमधले हे स्फोट घडविण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ६ जुलैला मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली होती आणि म्हणूनच बोधगयेतल्या स्फोटानंतर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येऊन या शहरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता.

महाबोधी मंदिराच्या परिसरात स्फोटानंतर सापडलेल्या काही पुराव्यांवरून या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्दीनचाच हात असावा असा कयास करण्यात आलाच होता. कारण या संघटनेने हैदराबादमध्ये घडविलेल्या स्फोटात वापरलेली स्फोटके आणि महाबोधी मंदिरात वापरलेली स्फोटके सारखीच होती. महाबोधी मंदिरात स्फोटकांचा वापर करण्यासाठी गॅसच्या टाक्यांचा वापर करण्यात आला. ही पध्दत नवी असली तरी स्फोटके मात्र हैदराबादसारखीच होती. पण राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी या पुराव्यावरून अद्यापतरी कसलाही निश्‍चित निष्कर्ष काढता येत नाही असे म्हटले आहे.

या संघटनेच्या काल मिळालेल्या संदेशाची शहानिशा केल्याशिवाय काहीही भाष्य करण्यास या अधिकार्‍यांनी नकार दिला. दरम्यान या स्फोटानंतर महाबोधी मंदिरातील नेहमीचे धार्मिक उपचार सुरळीत सुरू झालेले आहेत.