डेहराडून : गेल्या २५ दिवसांपासून उत्तराखंडमधील केदारनाथ येथे आपद्ग्रस्तांच्या मदतकार्यात गुंतलेल्या जवानांना औषधांचा आणि अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातील काही जवान आजारी पडले असून त्यांच्यावरच उपचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. केदारनाथ परिसरात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाचे ७४ जवान मदतकार्यात गुंतलेले आहेत. त्यांना विमानातून आणि हेलिकॉप्टरमधून अन्नाचा आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून केदारनाथ परिसरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असल्यामुळे या पथकाला औषधे आणि अन्न पुरविण्यात अडथळे येत आहेत.
या पथकातील ४० जवानांना अतिसार आणि गॅस्ट्रोची बाधा झालेली आहे. उर्वरित जवानां प्रकृती अन्नाअभावी ढासळत आहे. आता या पथकाकडे केवळ एक दिवस पुरेल एवढाच अन्न आणि औषधांचा साठा शिल्लक आहे. गेल्या ५ दिवसांपासून त्यांना कशाचाच पुरवठा करता आलेला नाही आणि पुरवठा करण्याचे प्रयत्न असफल होत आहेत. त्यांच्यासाठी डेहराडूनच्या विमानतळावर अन्न आणि औषधांनी भरलेली विमाने जय्यत तयार आहेत. परंतु खराब हवामानामुळे विमानांचे उड्डाण होत नाही, अशी माहिती उत्तराखंडाचे मुख्य सचिव सुभाषकुमार यांनी दिली.
केदारनाथ जवळ अजूनतरी अडकलेले प्रवासी कोणी शिल्लक दिसत नाहीत. परंतु तेथे मरण पावलेल्या प्रवाशांचे आणि पर्यटकांचे अंत्यविधी करण्यासाठी म्हणून हे ७४ जवान तिथे थांबलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ९३ मृतदेहांना अग्नी दिलेला आहे. अजून काही मृतदेह सापडत असतील तर ते शोधून त्यांचे अंत्यविधी उरकावेत म्हणून हे पथक केदारनाथला थांबलेले आहे. परंतु खराब हवामान आणि वाळलेल्या लाकडांचा अभाव यामुळे अंत्यविधीच्या कामातसुध्दा अडथळे येत आहेत. म्हणून हे जवान तेथे थांबलेले आहेत पण दुर्दैवाने त्यांनाच अन्नाचा तुटवडा जाणवत आहे.