लिफ्टच्या देखभालीसाठी मोबाईल आधारित यंत्रणा

पुणे : मोठ्या इमारतींमध्ये वापरल्या जाणार्‍या लिफ्टची देखभाल आणि सुरक्षा यासाठी कोरियातील ह्युंदाई एलव्हेटर या कंपनीने मोबाईलवर आधारित अत्याधुनिक यंत्रणा विकसित केली असून या यंत्रणेची विक्री पुण्यात सुरू झाली आहे. या सेवेच्या प्रारंभाच्या निमित्ताने ह्युंदाई एलव्हेटरचे अध्यक्ष मार्टिन हान यांनी पत्रकार परिषद घेऊन तिचे तपशील विषद केले. या यंत्रणेची विक्री भारतामध्ये तर सुरू झालेली आहेच, परंतु तिची निर्मिती भारतात आणि निर्यात अन्य अनेक देशात केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

निर्यात होणार्‍या देशांमध्ये श्रीलंका, बांगला देश आणि पश्‍चिम आशियाई देशांचा समावेश आहे. चीनमधील शांघाय शहरात कंपनीचा एक कारखाना असून पुण्याजवळ कोरेगाव भीमा येथे टाकवे गावाजवळ दुसरा कारखाना आहे. कंपनीने या मोबाईल देखभाल सेवेसोबतच स्वयंचलित वाहनतळही पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. जानेवारी १४ पर्यंत या वाहन तळाची विक्री सुरू होईल. भारतात अशा प्रकारचा उद्योग उभारण्यात आला आहे, मात्र या उद्योगात तयार होणारे वाहनतळ प्रशिक्षणासाठी वापरले जाणार आहेत. भारताबरोबरच ब्राझील आणि इराणमध्येही हे वाहनतळ तयार केले जातील. परंतु या दोन देशातले मनुष्यबळ भारतापेक्षा महाग असल्यामुळे भारतातले उत्पादन कमी खर्चात होते. म्हणून कंपनीने भारतातल्या उत्पादनावर भर देण्याचे ठरवले आहे.

कंपनीतर्फे लिफ्टची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुणे आणि मुंबई शहरामध्ये कंपनीने आजवर २५०० लिफ्ट विकले आहेत. येत्या काही वर्षात भारतात वाहनतळ आणि लिफ्ट या दोन्हींची मागणी वाढणार असल्यामुळे भारत या दोन सेवांच्या उत्पादनात आघाडीवरचा देश म्हणून पुढे येण्याची आशा आहे. भारतात लिफ्टची सेवा देणारी २३ सेवाकेंद्रे आहेत आणि या सेवाकेंद्रांची संख्या वेगाने वाढवली जाणार आहे.