भारतीय अभियंत्यांचे कौतुकास्पद यश

पुणे : भारतातले अभियंते जगातल्या अन्य कोणत्याही देशातल्या अभियंत्यांपेक्षा कमी नाहीत, ही गोष्ट त्यांनी वारंवार दाखवून दिलेली आहे. तरीही भारतातील अभियांत्रिकीच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केल्या जातात. अशा लोकांच्या शंकांना चोख उत्तर देण्याचे काम पुण्यातल्या जेसीबी इंडिया या कंपनीच्या भारतीय अभियंत्यांनी करून दाखवले आहे. या कंपनीत २० टन वजनाचा एक्सकेव्हेटर तयार करण्यात आला आहे. या एक्सकेव्हरच्या निर्मितीतून त्यांनी भारतात सुद्धा जागतिक दर्जाचे काम होऊ शकते, हे दाखवून दिले आहे.

अशा प्रकारच्या एक्सकेव्हेटरचे डिझाईन तयार करण्यापासून त्याची पूर्ण निर्मिती करण्यापर्यंतचे काम जेसीबी इंडियाच्या पुण्यातील कारखान्यात काम करणार्‍या दोनशे पेक्षाही अधिक अभियंत्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. हा २० टनी एक्सकेव्हेटर पश्‍चिम आशिया, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील काही देशांमध्ये निर्यात केला जात आहे. कंपनीच्या कारखान्यात नुकतेच या नव्या एक्सकेव्हेटरचे प्रात्यक्षिक पत्रकारांना दाखविण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन सोंधी यांनी या एक्सकेव्हेटरची माहिती दिली.

त्याच्या निर्यातीतून भारताला मोठ्या प्रमाणावर डॉलरची प्राप्ती होत आहे. त्याशिवाय त्याच्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. म्हणूनच कंपनीने आता राजस्थानात जयपूर येथे सुद्धा एक नवा कारखाना काढायचे ठरवले आहे. त्यावर पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे. श्री. विपीन सोंधी यांनी या नव्या एक्सकेव्हेटरची काही वैशिष्ट्ये नमूद केली. तो कोणत्याही हवामानात काम करू शकतो आणि कमीत कमी इंधनात काम करत असल्यामुळे एका यंत्रामुळे वर्षाला १ लाख ३० हजार रुपयांची इंधन बचत होते, असे श्री. सोंधी म्हणाले. या एक्सकेव्हेटरची निर्यात ब्राझील, ब्रिटन आणि चीन याही देशात होते ही गोष्ट अभिमानाची आहे.

Leave a Comment