निवडणुकीत भाजप-सेनेचा 26-22 फॉर्म्युला कायम

औरंगाबाद, दि. 9 (प्रतिनिधी)-  आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप 26 आणि शिवसेना 22 जागांवरच निवडणूक लढवणार असून आरपीआयला भाजप व शिवसेना जागा देतील, अशा माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो. तथापि, त्या जागा कोणत्या याबद्दल अद्याप काही ठरलेले नाही, असेही ते म्हणाले.

भाजपची विभागीय बैठक आज येथे संत एकनाथ रंगमंदिरात झाली. त्यासाठी शहरात आलेले फडणवीस यांची भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला स्थानिक नेत्यांबरोबरच आ. पंकजा पालवे याही उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला पूर्वीचाच राहणार असून त्यात बदल होणार नाही. मी, गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांची यासंदर्भात अलीकडेच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय झाला. आरपीआयला वेगळ्या जागा सोडण्याऐवजी भाजप व शिवसेना आपल्याला कोट्यातूनच कोणत्या जागा द्यायचे ते ठरवणार आहेत. आरपीआयला कोणत्या आणि किती जागा द्यायच्या, हे अद्याप ठरलेले नाही.

मोदी फॅक्टरबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, भाजप कधीही हिंदुत्ववादापासून दूर जाऊ शकत नाही. हिंदुत्व ही एक जीवनशैली असून त्यात अन्य धर्मीयांनाही स्थान आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाबद्दल अपराध बोध नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी हे आमचे ज्येष्ठ व कार्यक्षम नेते असून त्यांचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेले गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे एका पुस्तक प्रकाशन समारंभात निवडणूक सुधारणांबाबत बोलले होते. पण त्यांच्या भाषणातले एक वाक्य वेगळे करून त्यांना टार्गेट करण्यात आले, हे चूक आहे. त्यांचे संपूर्ण भाषण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगच नोटीस मागे घेईल. याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे यांच्याविरुद्ध षड्यंत्र केलेले असले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. या बाबतीत भाजप मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.

 

Leave a Comment