कोल्हापूर, दि. 8 (प्रतिनिधी) – शहरातील रस्ते प्रकल्पांतर्गत्त लागू होणारा टोल रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चाला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरात आज टोल विरोधात मोर्चा, घोषणा, भाषणे, बंद आणि निदर्शनांमुळे मोठा एल्गार झाला.
मोर्चात सामील होण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरिकांना आपले सर्व व्यवहार बंद ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर या सभेत आडमार्गाने जनतेशी गदारी करून टोल लावू पाहणार्या सर्व मंत्र्यांना कोल्हापुरात थारा देणार नाही, असा निर्धार करण्यात आला. कोल्हापुरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्यांसाठी लागू होणार्या टोलच्या विरोधात गेले दोन वर्षे सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या वतीने टोल रद्द करावा, या मागणीसाठी सातत्याने आंदोलने सुरू करण्याचा घाट घातला असल्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवून टोल सुरू सकरण्याचा घाट घातला असल्याने कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महामोर्चासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातूून तसेच इतर शहरातून व कोल्हापूर शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
टोल विरोधात निदर्शने व निषेध करण्यासाठी प्रत्येक संघटनेने वेगवेगळ्या प्रकारे सादरीकरण केले होते. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी टोलरूपी राक्षसाचा धनुष्यबाणाने वध, जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी टोलासूर राक्षस, धनंजय महाडिक युवा शक्तीचा टोलबाबत सरकारची भूमिका गांधींच्या तीन माकडांसारखी आवस्था असलेले पोस्टर, रिपाइंचा टोलवसुलीचा अध्यादेशाची तिरडी, त्यामध्ये ख्या बक्याचे मुंडके, शाहिराचा पोवाडा, गोंधळी गीत हे लक्षवेधी होते.
आज सकाळी 10 वाजल्यापासूनच गांधी मैदानावर शहर व जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी जमू लागले. ढोल, ताशा, संबळ, हलगीच्या गजरात गांधी मैदानावरील वातावरण चैतन्यमय बनले. मोर्चात सहभागी होण्यासाठी लोक झुंडीने येत होते. प्रत्येक भागातील काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, रिपाइं, माकप, भाकप, मनसे या प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळांचे कार्यकर्ते गांधी मैदानात आले होते. गांधी मैदानात टोल विरोधी कृती समितीचे नेते निवासराव साळोखे, गोविंदराव पानसरे, प्रा. एन. डी. पाटील, बाबा इंदूलकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, महिपतराव बोंद्रे, माजी आमदार संपतरावबापू पाटील, अॅड. धनंजय पठाडे, रामभाऊ चव्हाण, माजी महापौर नंदकुमार वळंजू, उपमहापौर परिक्षित पन्हाळकर, माजी आमदार नामदेवराव भोईट आदींसह मान्यवर उपस्थित होते. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी सर्वांचे स्वागत केले.