पोर्ट ऑफ स्पेन- तिरंगी स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण लढतीत यजमान वेस्ट इंडिज श्रीलंकेशी रविवारी लढत होणार आहे. विडीजला भारताने पराभूत केल्यारने या स्पर्धेतील रंगत वाढली आहे. त्यामुळे आजच्या लढतीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यावर अतिंम फेरीचे समीकरण अवलंबून असल्याचने ही लढत महत्वपूर्ण मानली जात आहे.
सलग दोन विजयांनंतर विंडीजची अंतिम फेरी निश्चित मानली जात होती. मात्र भारताच्या उंचावलेल्या कामगिरीमुळे त्यांचा ‘फायनल’ प्रवेश लांबला. भारताकडून पराभूत झाले तरी नऊ गुणांनिशी वेस्ट इंडिज गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेवर विजय मिळवत अंतिम फेरी निश्चित करण्यास ब्राव्हो आणि सहकारी उत्सुक आहेत. याउलट स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी लंकेलाही विजय आवश्यक आहे. दोन लढतींनंतर त्यांच्या खात्यात ५ गुण आहेत.
लंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत वेस्ट इंडिजला कर्णधार ड्वायेन ब्राव्होविना खेळावे लागेल. भारताविरुद्ध शुक्रवारी यजमानांना षटकांची गती (स्लो ओव्हर रेट) राखता आलेली नाही. त्याबद्दल मॅच फी कापण्यात आली आहे, मात्र कर्णधारपद सांभाळताना १२ महिन्यांत दोनदा षटकांची गती न राखता आल्याने आयसीसी नियमाप्रमाणे ब्राव्होवर एका सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेची भिस्त फलंदाजांवर आहे. यजमानांकडे ख्रिस गेल, जॉन्सन चार्ल्स, डॅरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स आणि कीरॉन पोलार्ड असे नावाजलेले फलंदाज आहेत.