मिल्खासिंग यांचा हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये सन्मान

लंडन दि.६- फलाईंग सिख अशा नावाने देशभर ओळखले जाणारे भारताचे महान अॅथलिट मिल्खासिंग यांना क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे हाउस ऑफ लॉर्डसमध्ये एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. हाऊस ऑफ लॉर्डसचे सदस्य व एनआरआय उद्योगपती स्वराज पॉल यांनी मिल्खासिंग यांचा सत्कार केला.

मिल्खासिंग यांच्या जीवनावर बनविला गेलेला -भाग मिल्खा भाग- हा चित्रपट येत्या १२ जुलैला प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मिल्खासिंग लंडन येथे आले आहेत. या सत्कारावेळी बोलताना पॉल यांनी मिल्खासिग यांचा सत्कार करण्याची फार इच्छा होती असे सांगतानाच त्यांनी जे ध्येय गाठले आहे त्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे सांगितले. ते म्हणाले की त्यांच्या जीवनावर चित्रपट निघाल्याचे खरे समाधान आहे कारण त्यामुळे देशातील युवा पिढीला आणि तरूण अॅथलिटना प्रेरणा मिळू शकणार आहे. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या मिल्खासिग यांनी सातत्य व कष्टांच्या जोरावर दुनियेत कसे नांव कमावले याचे दर्शन या चित्रपटामुळे होऊ शकेल.