मुंबई दि.६ – लग्नाचा हंगाम सध्या संपल्यात जमा आहे आणि सण वारांना अजून कांही कालावधी आहे या कारणास्तव देशातील सोने व्यापार्यांलनी सोने खरेदी सध्या थांबविली आहे. सोन्याच्या किमती आणखी खाली येतील असाही तज्ञांचा अंदाज असल्याने व्यापार्यांनी सोने खरेदीला सध्या हॉल्ट दिला आहे.
भारत जगातील सर्वात मोठा सोने आयातदार देश आहे. मात्र सोने आयात कमी व्हावी यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांत रिझर्व्ह बँकेने सराफांना कनसाईनमेंट बेसिसवर आयातीस बंदी घातली आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर सोने आयात शुल्कात वाढ करून ते ८ टक्के केले गेले आहे. परिणामी सोने व्यापार्यांना दिवसांला पाच किलो सोने विकणेही अवघड बनले असल्याचे समजते.
चेन्नई येथील एमआरव्हीसी होलसेल संस्थेचे संचालक दमन प्रकाश रोठोड यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात लग्नाचा हंगाम आता संपत आला आहे. सण वार आणि लग्नाचा सिझन ऑगस्टपासून पुन्हा सुरू होईल व तो डिसेंबर अखेर असेल. यामुळे सध्या व्यापारी सोने खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. त्यात दर सातत्याने घसरत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही गुंतवणक केलेल्यांना सोने चांदीचे दर घसरल्याने नुकसान सोसावे लागले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.