कंगणा सापडली पेचात

बॉलीवूडमधील बिनधास्त स्वभावाच्या अभिनेत्रींमध्ये गणती होणार्‍या कंगणा राणावतची फिल्मी कारकीर्द सध्या उत्तमपणे सुरू आहे. विविध चित्रपटांतून आपल्या अभिनय कौशल्याची ओळख करून देणार्‍या कंगणाकडे सध्या बड्या बॅनरचे अनेक चित्रपट आहेत. व्यावसायिक पातळीवर असे सगळे काही सुरळीत असताना तिच्या वास्तव आयुष्यात मात्र काही बिनसले असल्यासारखे वाटत आहे. तिच्यासमोर सध्या एक भलताच पेचप्रसंग उभा राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगणाने पश्‍चिम मुंबईतील एका इमारतीमध्ये एक अतिशय सुंदर व आलिशान फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटच्या खरेदीच्या बदल्यात तिला दोन कोटी रुपये चुकते करायचे होते. मात्र फ्लॅटच्या खरेदीचा व्यवहार झाला तेव्हा बहुधा कंगणाला या सगळ्य़ाची जाणीव नव्हती, असे वाटू लागले आहे. कंगणाने ज्याच्याकडून हा फ्लॅट खरेदी केली होता, तो आता ही मालमत्ता कंगणाच्या नावावर करण्यासाठी तिच्याकडून व्यवहारात ठरल्याप्रमाणे दोन कोटी रुपयांची मागणी करीत आहे. हा फ्लॅट कंगणाच्या नावावर करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी एकदम चुकीची असल्याचे कंगणांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. ही रक्कम जास्त वाटत असल्याने कंगणाने आता कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.

या पेचातून सुटका करून घेण्यासाठी तिने आपल्या वकिलाचा सहारा घेतला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगणाच्या वकिलाने या इमारतीचा बिल्डर आणि संबंधित मालक आपापसात समजोता करून फ्लॅटचा ताबा देणार नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. कंगणा आणि बिल्डरमधील हा वाद मागील दोन वर्षापासून सुरू असून अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे कंगणा चांगलीच त्रस्त झाली आहे. आता हे प्रकरण पुढे पोहोचल्याने तिला कधी फ्लॅटचा ताबा मिळतो व ती तिथे कधी राहण्यास जाते हे सांगणे कठीण आहे.

Leave a Comment