महेश, सयाजी आणि भरतची जुगलबंदी

मातब्बर गायकांची किंवा वादकांची जुगलबंदी ज्याप्रमाणे कानसेनांना अमृतानुभव देऊन जाते, त्याचप्रमाणे मातब्बर अभिनेत्यांची अभिनयातली जुगलबंदी त्यांच्या चाहत्यांना सुखावून जाते. राज कपूर-दिलीप कुमार, दिलीप कुमार-अमिताभ बच्चन किंवा मराठीत निळू फुले-श्रीराम लागू अशा जोडय़ांच्या जुगलबंदीचा आस्वाद प्रेक्षकांनी मनमुराद घेतला. आता ब-याच वर्षानी ‘सत ना गत’च्या निमित्ताने प्रेक्षकांना मराठी चित्रपटात पुन्हा अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

महेश मांजरेकर, सयाजी शिंदे आणि भरत जाधव हे मातब्बर अभिनेते ‘सत ना गत’मधून प्रथमच एकत्र आले आहेत. या प्रत्येक अभिनेत्याची स्वत:ची शैली आहे, स्वत:ची बलस्थानं आहेत आणि तिघेही ताकदीचे कलाकार आहेत. त्यामुळेच या तिघांच्या अभिनयाची खडाजंगी बघायला मिळेल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या ‘सत ना गत’ या गाजलेल्या, खळबळजनक कादंबरीवर आधारित, ‘देविशा फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटात महेश मांजरेकर ब-याच कालावधीनंतर मराठीत खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. भरत जाधव एका ध्येयवादी पत्रकाराच्या भूमिकेत असून सयाजी एका स्थानिक वर्तमानपत्राच्या मालक-संपादकाच्या भूमिकेत आहे. समाजाच्या भल्यासाठी पत्रकारिता करत असल्याचा आव आणून प्रत्यक्षात स्वत:ची पोळी भाजून घेणारा असा हा मालक-संपादक आहे. पाखी हेगडे ही प्रादेशिक चित्रपटांची सुपरस्टार अभिनेत्री या निमित्ताने मराठीत पदार्पण करत आहे.

महेश आणि भरत यांनी यापूर्वी एकत्र काम केले आहे. महेशने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये भरतने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भरत आणि सयाजी यांनीही एकत्र काम केले आहे. हे तिघे एखाद्या चित्रपटात एकत्र येण्याची मात्र ही पहिलीच वेळ आहे. मराठीतला ख-या अर्थाने मल्टिस्टारर म्हणता येईल, अशा या आशयघन, करमणूकप्रधान चित्रपटाचं दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. नितीन तेंडुलकर आणि अरविंद जगताप यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘साईशंकर फिल्म्स’ची निर्मिती आणि ‘देविशा फिल्म्स’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १२ जुलै रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment