जोहान्सबर्ग दि.२७ – दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णी नेते आणि माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती अधिकच गंभीर बनली असल्याचे प्रिटोरिया रूग्णालयातील त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मंडेला यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले आहे. न्यूमोनियाचा त्रास वाढल्याने तीन आठवड्यापूर्वी त्यांना या रूग्णालयात दाखल केले गेले आहे.
मंडेला यांच्या खोलीत त्यांच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जात नसल्याचे आणि त्यांच्यावर उपचार करणारे वैयक्तीक डॉक्टर बी.जे. रामलखन यांनाच फक्त त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी दिली गेली आहे. मंडेला यांच्या किडनी फेल झाल्याने त्यांच्यावर डायलिसिस केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. नातेवाईकांना मंडेला यांना लावलेल्या व्हेंटिलेटर काढायचा का असेही विचारले गेले असल्याचे समजते.
दरम्याम मंडेला यांचे नातू व अन्य मुलांमध्ये मंडेला यांचे दफन कोठे करायचे यावरून वाद सुरू झाला आहे. मंडेला यांचे नातू मंडल यांनी त्यांच्या जन्मगावी म्हणजे मेझो येथेच दफन करायचा आग्रह धरला आहे तर त्यांच्या बाकी मुलांनी मंडेला यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे दफन त्यांच्या मुलांच्या दफन जागेजवळच करायचे असा आग्रह धरला आहे. मंडल हे मेझो ट्रॅडिशनल कौन्सिलचे प्रमुख असून त्यांनी त्यांचे काका, वडील आणि आत्या म्हणजे मंडेलांचे दोन मुलगे आणि एक मुलगी यांचे दफन केलेल्या क्यूनू या ठिकाणाहून मृतदेहांचे स्थलांतर करून ते पुन्हा मेझो येथे २०११ साली दफन केले आहेत असे समजते. मंडेलांचे घर क्यनू येथेच आहे.