श्रीनगर दि.२७ – हिमालयातील अमरनाथ यात्रा आज सकाळपासून सुरू झाली असून आज सकाळीच यात्रेकरूंची पहिली तुकडी अमरनाथ गुंफेकडे रवाना झाली. हवामान स्वच्छ राहिल्यास या तुकडीतील भाविकांना बर्फानी बाबाचे दर्शन दोन दिवसांत होईल असे सांगितले जात आहे. १४५०० फूट उंचीवरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी यंदा ३ लाख भाविकांनी नोंदणी केली असल्याचे समजते.
दरवर्षी प्रमाणेच यंदाही या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर १ लाखांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात्रेच्या संपूर्ण काळात ५५ दिवस हे जवान यात्रेकरूंना मदत आणि संरक्षण देण्यासाठी सिद्ध राहणार आहेत. लखनपूर ते गुंफा या मार्गावर हे सैनिक तैनात आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दररोज १५ हजार भाविक पहलगाम आणि बालतल या दोन मार्गांनी अमरनाथ गुंफेकडे रवाना केले जाणार आहेत. जूम्मूत यात्रेकरूंचा मुख्य तळ असून येथे सतत पडत असलेल्या पावसाने तयारीत अनेक अडचणी आल्या आहेत. जम्मू ते बालतल आणि जम्मू ते पहलगाम या मार्गावर सीआरपीएफचे जवान तैनात आहेत तर पहलगाम ते गुंफा आणि बालतल ते गुंफा या मार्गावर लष्कर, बीएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात केले गेले आहेत.
सेनाप्रमुख विक्रमसिग या विषयी सांगताना म्हणाले की दर वर्षीच या यात्रेला दहशतवादी हल्ल्यांचा धोका असतो मात्र दहशतवाद्यांचे कोणतेही कृत्य हाणून पाडण्यास आमचे जवान सज्ज आहेत.