पंडित नेहरू हे स्वातंत्र्यापूर्वीची काही वर्षे आणि नंतरची काही वर्षे एवढे लोकप्रिय होते की ते जातील तिथे त्यांना भेटायला हजारो लोक येत असत. त्यांनाही जमावाची सवय झाली होती. त्यांच्याही मनात जनते विषयी प्रेम होते. जनतेचे नेते असेच असतात. त्यांना जनतेशी बोलायला आणि जनतेच्या अडचणी समजून घ्यायला आवडत असते. नेता आणि जनता यांचे हे द्वैत असेच असतेे. पण काही नेते जनता समोर दिसली की, वैतागतात. सामान्य माणूस भेटायला आला तर त्यांच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्या पडतात. असे नेते स्वत:ला नेते म्हणवून घेतात पण त्यांच्या खुषमस्कर्यांनी त्यांना तसे भासवलेले असते. प्रत्यक्षात ते नेता म्हणवून घेण्यास पात्र नसतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे असे एक पात्र आहे की जे आपण जनतेचे नेते होण्यास अपात्र आहोत हे वारंवार स्वत:च दाखवून देत असतात. त्यांची मग्रुरी, कोणाला तरी झापणं आणि कोणाशी तरी बेपर्वाईनं वागणं याचा एखादा तरी किस्सा दरमहा ऐकायला मिळत असतो.
काल त्याना पुणे जिल्ह्यातले काही नागरिक भेटायला आले होते. त्यांचे नातेवाईक केदारनाथाच्या परिसरातल्या अपघातात सापडले आहेत. त्यांचा काही पत्ता लागत नाही. राज्य शासनाने याबाबत काही मदत करावी आणि अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून काही प्रयत्न करावेत अशी त्यांची मागणी होती. आपले नातेवाईक तिथे आठवडा भरापासून सापडलेले आहेत म्हटल्यावर त्या लोकांची मनस्थिती कशी असेल याचा विचार करून त्यांच्याशी बोलायला हवे होते पण त्यांना भेटण्याचे आश्वासन दिले असूनही पवार त्यांना चुकवून गेले. माध्यमावर त्याची ब्रेेकिंग न्यूज झाल्यावर त्यांना आपले वागणे गैर होते याची जाणीव झाली आणि नंतर त्यांनी या लोकांना अन्यत्र आपल्याला भेटण्यासाठी पाठवावे असा निरोप दिला. पण बुंद से गई वो हौदसे नही आती. त्यांच्या अंत:करणात जनतेविषयी जिव्हाळा, आपुलकी नाही हे नेहमीच दिसत असते. ते जनतेला काय समजतात ते त्यांनाच माहीत पण त्यांच्या वागण्यावरून तरी लोकशाहीत जनता सार्वभौम असते हे त्यांना मान्य नसावे असे दिसते. म्हणूनच ते कसे कसे वागत असतात आणि कसे कसे बोलत असतात हे आपल्याला नेहमीच अनुभवाला येत असते.
पंडित भीमसेन जोशी यांचे निधन झाले तेव्हा अजित पवार पुणे जिल्ह्यात होते आणि ते पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत. भारत रत्न किताब दिलेले एक मोठे गायक आपल्यातून जातात तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर राहणे हे मंत्री म्हणून पवारांचे कर्तव्य होते पण त्यांनी ते कर्तव्य निभावले नाही. त्यांना त्या क्षणाला तरी या गोष्टीचे भान आले नाही. नंतर त्यावर टीका झाली तेव्हाही त्यानी काही खुलासा केला नाही. नंतर त्यांची जिभ अनेकदा सटकली. त्यांनी नको ती विधाने केली. त्यांना त्या बद्दल जनतेची माफी मागावी लागली. काही वेळा माध्यमांची माफी मागावी लागली. त्यांच्या त्या वागण्याचे भविष्यात होणारे परिणाम त्यांच्या लक्षात आले नाहीत. मग त्यांच्या ऐवजी श्री. शरद पवार यांनी माफी मागितली. एकदा तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावासाठी तो कमीपणा स्वीकारला. खडसवासला विधानसभा पोटनिवड णुकीत अजित पवार यांच्या वागण्या बोलण्यामुळे आणि उद्दामपणामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. पण या पराभवाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारली नाही. सुप्रिया सुळे यांनी ती स्वीकारली आणि आपण या पराभवाच्या कारणांचा शोध घेऊ असे म्हटले.
अजित पवारांच्यात एवढा ताठा कोठून आला याचे आश्चर्य सर्वांना वाटते. तो ताठा येण्याचे कारण असे की, ते कसेही वागले तरीही आपल्या बारामती विधानसभा निवडणुकीत कधीच पराभूत होत नाहीत. आपण काहीही केले तरीही आपली जागा कायम आहे हे त्यांना माहीत आहे. शिवाय कसेही झाले तरीही काका आपल्या मागे उभे राहतात याचाही त्यांना विश्वास आहे. त्यांनी गेल्या दोन तीन वर्षात केलेले पराक्रम अन्य कोणा मंत्र्याने केले असते तर तो पक्षात आणि राजकारणात कोठच्या कोठे फेकला गेला असता. नामशेष झाला असता. पण पवारांना आपल्या मतदारसंघातून निवडून येण्याची खात्री आहे आणि काका नावाची कवचकुंडले प्राप्त झाली आहेत. म्हणून ते काहीही बोलतात आणि त्यावर आपले चुकले असे नेहमी म्हणत नाहीत. ते बारामती विधानसभा मतदारसंघातून जन्मभर पडणार नाहीत आणि काका त्यांच्या पाठीशी सतत उभे राहणार आहेत हे मान्य करूनही असा प्रश्न विचारावासा वाटतो की, एवढी स्थिती भक्कम असली म्हणून काय झाले. जनतेशी कधीच चांगले वागू नये का ? नेहमी ताठयात वागायची काही गरज नाही.