येडियुरप्पा करणार आता भाजपसोबत युती

बेंगळूरू- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात रिंगणात उतरलेल्या कर्नाटक जनता पार्टीचे सर्वेसर्वा बी. एस. येडियुरप्पा यांनी माघार घेतली आहे. आता भाजपसोबत निवडणूकपूर्व युती करण्यास येडियुरप्पा यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता कर्नाटकातील समीकरण बदलणार आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी कर्नाटक जनता पार्टीची नुकतीच एक बैठक झाली. त्यावेळी इतर कोणत्यातरी पक्षाबरोबर युती करण्यावर चर्चा केली होती. भाजपसोबत युती करायला नको, असे मत पक्षातील नेत्यांनी त्यावेळी व्यक्त केले. मात्र, आता भाजपच्या प्रचारप्रमुखपदी मोदी यांची नियुक्ती झाल्यामुळे आमची भाजपसोबत युती करण्याची तयारी आहे, असे कर्नाटक जनता पार्टीचे सरचिटणीस धनंजयकुमार यांनी सांगितले. त्यामुळे आता आगामी काळात वेगळीच समीकरणे उदयास येणार आहेत.

काही दिवसापूर्वी कर्नाटकमधील लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपच्या नेतृत्त्वाने येडियुरप्पा यांना बाजूला टाकले. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकत नव्या पक्षाची निर्मिती केली होती. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कर्नाटक जनता पार्टीचा फटका कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. त्यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले होते.