
पुणे दि.२१ – गाडीत बसविलेल्या जीपीएस प्रणालीमुळे गाडीचालकाला लुबाडणारे आणि गाडी पळवून नेणारे दरोडेखोर सांगवी पोलिसांनी घटना घडल्यापासून तीन तासात जेरबंद केले असल्याचे समजते.

पुणे दि.२१ – गाडीत बसविलेल्या जीपीएस प्रणालीमुळे गाडीचालकाला लुबाडणारे आणि गाडी पळवून नेणारे दरोडेखोर सांगवी पोलिसांनी घटना घडल्यापासून तीन तासात जेरबंद केले असल्याचे समजते.
या संबंधीची हकीकत अशी की पहाटे तीनच्या सुमारास टेक महिद्रा कंपनीतील चालक गणेश रणकुंभ आणि सुरक्षा रक्षक गणेश पवार हे चिखली येथून कंपनीतील कर्मचार्यांकना आणण्यासाठी जात होते. सांगवी फाट्याजवळ दोन मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी हे दोघे गाडीखाली उतरले असताना चाकूचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि हिजवडी जवळच्या टेकडीवर नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल, घड्याळ, एटीएम कार्ड व अन्य वस्तू काढून घेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि गाडी घेऊन ते पळून गेले.
या चोरटयांनी एटीमएम कार्ड वापरून २० हजार रूपये काढले. मात्र तोपर्यंत दोघाही गणेशनी हातपाय सोडवून घेऊन कंपनी गाठली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्वरीत सांगवी पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. या गाडीत जीपीएस बसविलेले असल्याने पोलिसांना ही गाडी पहाटे सहाच्या सुमारास केळगाव येथे असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरीत तेथे जाऊन ललित खोलम याला अटक केली. त्याचे तीन साथीदार पळून गेले. त्यातील राहुल रजपूत यालाही थोड्याच वेळात पोलिसांनी पकडले.
पोलिस उपायुक्त शहाजी उमप म्हणाले की या चौघांचा रस्त्यावरील ट्रक लुटण्याचा विचार होता व त्यासाठी त्यांना कारची आवश्यकता होती असे चौकशीत समजले असून हे चौघेही आडबाजूंच्या घरांवर दरोडे टाकत असल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. कारमालकांनी गाडीत जीपीएस यंत्रणा अवश्य बसवून घ्यावी असेही आवाहन उमप यांनी केले आहे.