मुंबई – मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या मंत्रालयाच्या नुतनीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी ते पूर्ण व्हायला अजून बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे मंत्रालयाबाहेर गेलेले विभाग पुन्हा येथे यायला वेळ लागणार आहेत. हे कार्यालय येथे येत नाहीत तोपर्यंत मंत्रालयातील कारभार पूर्णपणे सुरळीत होणार नाही. त्यामुळे एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे.
२१ जून २०१२ ला दुपारी मंत्रालयाला आग लागली. मंत्रालयाचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हातात हतबलपणे या आगीकडे पाहण्यापलीकडे काहीच नव्हते. कारण आगीशी लढा देणारी कोणतीच यंत्रणा मंत्रालयात नव्हती. अग्निशमन दलाच्या गाड्या आतपर्यंत पोहचण्यासाठी जागा नव्हती. त्यातच मंत्रालयातील दालनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेलेले प्लायवूड, मंत्रालयातील कागदाच्या फाईल्सचे गठ्ठे यामुळे आग झपाट्याने पसरली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला.
या आगीनंतर राज्य सरकारने मंत्रालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. जळालेल्या मजल्यांबरोबरच इतर मजल्यांचंही नूतनीकरण केले जाणार आहे. सध्या मंत्रालयातील जळलेल्या ४ ते ७ मजल्यांच्या मेकओव्हरचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना मंत्रालयातील कर्मचा-यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कामामुळे होणारा आवाज, धूळ यामुळे मंत्रालयातील कर्मचारी त्रस्त आहेत. मंत्रालयातील वरील चार मजल्यांच्या मेकओव्हरचे काम पूर्ण व्हायला अजून २ ते ३ महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खालील तीन मजल्यांच्या मेकओव्हरचे काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रालयाची घडी पूर्वीसारखी बसायला अजून अंदाजे वर्षभराचा कालावधी जाईल अशी शक्यता आहे.