जातीयवादापुढे लोटांगण

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारातून नेमके काय साध्य झाले असा प्रश्‍न काही लोक विचारीत आहेत. लोकांना यातून काही तरी साध्य व्हावे असे वाटत असते पण सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे काही तर साध्य करायचे असते. तेव्हा लोकांना काही साध्य झाले नाही असे वाटले तरी कॉंग्रेस पक्षाने काही तरी साध्य केल्याचे समाधान मानलेले असते. विशेषत: जातीच्या गणिताचे काही तरी उत्तर मिळवण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला असतो. कार्यक्षमतेचा मुद्दा गौण ठरवून केवळ जातीच्या आधारावर कोणाची तरी वर्णी लावून त्या जातीचे मते मिळवण्याचा त्यांचा दावा असतो. कर्नाटकात मागासवर्गीयांना जवळ करता यावे यासाठी आता मल्लिकार्जुन खगैं यांना रेल्वे मंत्री करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना कर्नाटकाचे मुख्यमंत्रिपद दिले जाईल असे वाटत होते पण त्यांना डावलण्यात आले. त्यावर त्यांच्या जातीच्या संघटनेने बैठक घेतली आणि यापुढे कर्नाटकात कॉंग्रेसला जातीतल्या कोणीही मत देणार नाही असा ठराव केला. त्यांचा हा राग शमविण्यासाठी खर्गे यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आले आहे. खर्गे यांना हे पद देता यावे म्हणून सी.पी. जोशी यांना या पदावरून काढण्यात आले आणि जोशी यांना काढल्याने राजस्थानातल्या ब्राह्मणांना राग येऊ नये म्हणून गिरीजा व्यास यांना घेण्यात आले. एकंदरीत सारी जातीची आणि मतांची गणिते आहेत.

या आठ जागा भरण्यातून लोकांना काही प्रेरणादायी संदेश जाणार नाही. म्हणून सरकारने तसा काही दावा केला नव्हता पण एक गडबड झाली. या विस्तारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी, आगामी निवडणुकीत आपल्याच आघाडीला सत्ता मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. त्यामुळे प्रश्‍न निर्माण झाले आणि लोकांनी प्रश्‍न विचारायला सुरूवात केली की, ८६ वर्षांचे मंत्री सरकारमध्ये घेऊन ते पुन्हा कसे सत्तेवर येणार आहेत ? विस्तार करून आत घेतलेल्या आठ मंत्र्यांचे सरासरी वय ७१ आहे. त्यात ५९ वर्षांपेक्षा तरुण कोणीच नाही. राहुल गांधी सध्या पक्षात मोठे परिवर्तन घडवण्याच्या घोषणा करीत आहेत. मंत्रिमंडळातल्या विस्तारात करण्यात आलेली मंत्र्यांची निवड या परिवर्तनाच्या वल्गनांशी विसंगत आहेत. राहुल गांधी हे कसे तरणेबांड आहेत आणि ते पंतप्रधान झाले तर देशात कसे तरुणांचे युग अवतरेल असे दावे कॉंग्रेसचे नेते करीत असतात. राहुल गांधी यांनी मोठ्या उद्योगपतींच्या समोर केलेल्या भाषणात, देशातल्या सत्तेपासून दूर असलेल्या लोकांना सत्तेच्या परिघात आणण्याची मनिषा व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी नुकतीच संघटनात्मक ङ्गेररचना केली आणि काल मंत्रिमंडळात नवे मंत्री घेतले.

या दोन्ही भरतीत राहुल गांधी म्हणतात तसे तरणेबांड कोणी नाहीतच. संघटनात्मक बदलातही तसे तरुण घेतले नाहीत आणि समाजातल्या सत्तेपासून वंचित असलेल्या वर्गातला एकही कार्यकर्ता त्यांना या दोन्ही बदलात विचारात घ्यावा असा वाटला नाही. या ङ्गेरबदलात प्रस्थापितांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली पाहिल्यावर राहुल गांधी यांची ती भाषणे केवळ कोणीतरी लिहून दिली आहेत म्हणून केलीत असे वाटते. त्या वाक्यांचा अर्थ त्यांना कळलेला नाही आणि त्याचा गर्भितार्थही त्यांच्या मेंदूपर्यंत पोचलेला नाही हे लक्षात येते. कॉंग्रेसच्या नेत्यांची भाषणे वेगळी आणि प्रत्यक्षात कृती वेगळी असते असे आजवर आपल्याला दिसले त्याला राहुल गांधी अपवाद नाहीत. उलट त्यांनी भाषणातल्या ढोंगीपणाची परंपरा अधिकच जोमाने जारी ठेवली आहे असे दिसते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना मंत्रिमंडळाच्या ङ्गेररचनेत पहिलेच मंत्री म्हणून सीसराम ओला हे सापडले. त्यांचे वय ८६ वर्षे आहे. काही कॉंग्रेस समर्थक, कोणाचेही केवळ वय पाहू नका, अनुभव पहा आणि कार्यक्षमता पहा असे ते म्हणतात. सीसराम ओला शपथ घेत होते तेव्हा आणि राष्ट्रपतींसमोरच्या वहीत सही करीत होते तेव्हा त्यांचे हातपाय कापत होते. त्यांना शपथही नीट वाचता येत नव्हती. ते कार्यक्षम आहेत असे म्हणण्याचे धाडस आजवर कोणीही करू शकलेला नाही.

सीसराम ओला हे जाट आहेत. केवळ जाटच आहेत असे नाही तर ते राजस्थानातले जाट आहेत. राजस्थान विधानसभेची निवडणूक येत्या तीन चार महिन्यात होणार आहे आणि तिथे भवरीदेवी वासनाकांडात एक जाट मंत्र्याला अटक झाली आहे. त्यामुळे जाट समाज सरकारवर नाराज आहे. ती नाराजी काढण्यासाठी कॉंग्रेसला काही तरी करावे लागले. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार वसुंधरा राजे याही जाट आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर देण्यासाठी ८६ वर्षांच्या सीसरामांना मुंडावळ्या बांधण्यात आल्या आहेत. मडेरना यांना योग्य कारणाने अटक झाली असेल तर त्यावर जाट समाजाने नाराज का व्हावे आणि हा समाज नाराज झाला असला तरीही सरकारला या समाजाची अशी समजूत काढावी असे का वाटावे ? अशा वृद्ध नेत्याला मंत्री केल्याने हा समाज राजी होणार आहे का ? या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि त्यांच्यापायी एका अपात्र मंत्र्याला आपल्या माथी मारण्यात आले आहे. एका बाजूला धर्म निरपेक्षतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूला जातीच्या गणितावर मंत्रिमंडळात बदल करायचे हा ढोंगीपणा आहेे. एवढयावरही एखादा जाट समाजाचाच पण तुलनेने कमी वयाचा मंत्री कॉंग्रेसला मिळाला नाही. कारण मंत्री करावेत असे नेतेच कॉंग्रेसकडे नाहीत. पक्षाला नवी कुमक मिळत नाही. आहे त्या गर्दीतूनच अशा प्रस्थापित नेत्याला निवडावे लागत आहे.