मैदान गाजू लागले

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. खरे म्हणजे लोकांच्या अडचणीत सहभागी होऊन त्यांचे प्रश्‍न सोडवणे, जनतेच्या विविध क्षेत्रातल्या वाटचालीला दिशा देण्याचा प्रयत्न करणे, आपल्या पक्षाचा कार्यक्रम नीट राबवला जात आहे की नाही हे बघणे, पक्षाचा विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्यासाठी मेळावे, सभा, शिबिरे यांचे आयोजन करणे हीच निवडणुकीची खरी तयारी असली पाहिजे. परंतु सध्या राजकारणामध्ये पदांसाठी काम करणार्‍यांची एवढी गर्दी झाली आहे आणि हे लोक केवळ पदांसाठीच काम करायला लागले आहेत. त्यामुळे पक्षकार्य नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे पैसा, जात, धार्मिक भावना आणि प्रादेशिकता अशा गोष्टींचा विचार करून समाजामध्ये निरनिराळ्या प्रकारचे भेद पाडून, लोकांची दिशाभूल करून काही तरी करून निवडून येणे म्हणजेच पक्षाचे कार्य अशी व्याख्या होऊन बसली आहे. म्हणूनच निवडणुकीसाठी स्वत:ला सज्ज करताना सार्‍याच राजकीय पक्षांनी अशा निकषांवर पक्षात बदल करायला सुरुवात केली आहे.

भारतीय जनता पार्टीने मोदींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामागे हिंदू व्होट बँक कशी संघटित करता येईल याचा विचार आहेच, पण मोदी ओबीसी आहेत याचाही ङ्गायदा घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात भाजपाला ही खेळी महागात पडली आहे. त्यामुळे भाजपाचे जुने मित्र पक्ष त्याच्या जवळ यायला बिचकत आहेत. अर्थात ते सारेच पक्ष मुळात कॉंग्रेसविरोधी आहेत आणि कॉंग्रेसला विरोध म्हणून त्यांनी भाजपाच्या जवळ येणे साहजिक आहे. परंतु काही अडचणींमुळे विशेषत: मुस्लीम मतांमुळे हे पक्ष भाजपापासून दूर जात आहेत. जनता दल (यु) या पक्षाने काल भाजपाशी काडीमोड घेतला. त्यामुळे आपले नुकसान झाले तरी चालेल, पण आपण तत्वाशी तडजोड करणार नाही असे या पक्षाचे नेते नितीशकुमार यांनी म्हटले. पण आपण कोणत्या तत्वाशी तडजोड करणार नाही, याचा खुलासा त्यांनी केला नाही. ते तत्वाच्या गोष्टी बोलत असले तरी त्यांचा विचार मुस्लीम मतपेढीशी निगडित आहे. त्यांची मोदीविरोधी खेळी राज्यातल्या मुस्लीम मतदारांना सुखावून जाणार आहे आणि तिच्यामुळे लालूप्रसाद यादव यांचे यादव + मुस्लीम हे समीकरण ङ्गुटून नितीशकुमार यांचाच ङ्गायदा होणार आहे. आपण मोदींचे कट्टर विरोधक आहोत म्हणजे मुस्लिमांचा मित्र आहोत हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले आहे. मुलीच्या लग्नात पैशाची उधळपट्टी करणार्‍या भास्कर जाधव यांना पक्षातच काय पण सार्वजनिक जीवनात सुद्धा स्थान असता कामा नये, असे शरद पवार यांनी म्हटले होते. या गोष्टीला दोन-चार महिने सुद्धा झाले नाहीत पण सार्वजनिक जीवनात राहण्याची लायकी नसणार्‍या भास्कर जाधव यांना याच शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्षपद दिले आहे. राजकीय नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती विसंगती असते याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. पवारांनी काही केले नाही तरी आणि चुकीची चाल खेळली तरी त्यात नक्कीच काही तरी हुशारी आहे असेही म्हणणारा एक वर्ग आहे. परंतु भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची त्यांची चाल राज्यातल्या जनतेला चुकीचा संदेश देऊन गेली आहे. राष्ट्रवादीच्या पाठोपाठ कॉंग्रेस पक्षाने सुद्धा काल मोठे ङ्गेरबदल केले. पक्षात आणि मंत्रिमंडळात ङ्गेरबदल करण्याचा संकेत यापूर्वीच देण्यात आला होता. आता होत असलेले हे ङ्गेरबदल राहुल गांधींचे असतील, असाही संकेत मिळत आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारल्या पासून पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे आणि त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पक्षात हे ङ्गेरबदल करण्यात आले आहेत.

हे बदल राहुल गांधी यांच्या राजकारणाचा एक भाग आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. राहुल गांधी यांनी कॉंग्रेसची अशी पुनर्रचना करावी हे आवश्यकच होते. कारण पक्ष गलितगात्र झालेला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून विविध राज्यांच्या निवडणुका पक्षाला विविध निवडणुकांमध्ये जबर धक्के बसलेले आहेत. असे असले तरी राहुल गांधी प्रणित या ङ्गेरबदलाची निश्‍चित अशी दिशा स्पष्ट होत नाही. राहुल गांधी हे तरुण नेते आहेत पण त्यांनी पक्षामध्ये क्रांतिकारक ङ्गेरबदल केले आहेत असे काही दिसत नाही. पक्षामध्ये पदाधिकारी कितीही बदलले तरी शेवटी पक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीच चालवतात आणि त्यांना या संबंधात सल्ला देण्याचे काम अहमद पटेल हे करतात. अहमद पटेल यांचे पक्ष आणि सरकारमधल्या घटनांवरचे वर्चस्व कॉंग्रेसच्या नेत्यांना चांगलेच माहीत आहे. मात्र २०१४ सालच्या निवडणुका जिंकायच्या या इराद्याने करण्यात आलेल्या या बदलामध्ये अहमद पटेल यांच्या अधिकारात आणि पदात कसलाही बदल झालेला नाही. काही मंत्र्यांना मंत्रिपदावरून काढून पक्षाचे सरचिटणीस किंवा तत्सम पदे देण्यात आली आहेत. मात्र ज्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी यापूर्वी संघटनात्मक कामामध्ये कधी आपली झलक दाखवली आहे असे दिसलेले नाही.

Leave a Comment