आंबेडकरांचे आवाहन

महाराष्ट्राच्या आदिवासी कल्याण विभागात ६ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची एक फिर्याद मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. शासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी दिलेला हा पैसा आदिवासीं साठी न वापरता अधल्या-मधल्या दलालांनीच हडप केला आहे, असा आरोप आहे. परंतु महाराष्ट्र शासन गेल्या तीन वर्षांपासून या भ्रष्टाचाराची चर्चाच करत नाही. त्यामुळे चिडलेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींंनी राज्य शासनावर कडक ताशेरे झाडले आणि या भ्रष्टाचाराची चौकशी आपल्या निगराणीखाली सीबीआयने करावी, असा आदेश दिला. तो आदेश देताना न्यायमूर्तींनी शासनाला थोडी जरी लाज असेल तर आता तरी सीबीआयच्या या चौकशीला त्याने सहकार्य करावे, असे न्यायमूर्तींनी म्हटले. आदिवासी कल्याण विभागातील या भ्रष्टाचाराचा माओवाद्यांच्या वाढत्या प्रभावाशी काही संबंध आहे असे कोण्या सामान्य माणसाला वाटणार नाही. परंतु तो आहे. देशातले आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत आणि त्यामुळे हा वर्ग नक्षलवादाकडे झुकत आहे. एकंदरीत शासनातला भ्रष्टाचार आणि आदिवासींच्या जीवावर गबरगंड होण्याची प्रवृत्ती हिच्यामुळेच आदिवासी तरुण माओवादी संघटनांकडे आकृष्ट होत आहेत.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल जळगाव येथे बोलताना शासनातला भ्रष्टाचार आणि माओवादी संघटनांचा प्रसार यांचा संबंध असल्याचे सांगितले. परंतु माओवाद्यांचे या संबंधातले म्हणणे सरकार ऐकूनच घेत नाही, असे आंबेडकरांचे म्हणणे आहे. माओवादी संघटनांमध्ये अनेक सुशिक्षित बुद्धीवादी लोक आहेत. त्यांच्याशी सरकारने चर्चा केली पाहिजे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकरांच्या या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग माओवाद्यांचे बंड शमविण्यासाठी काय करता येईल यावर विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या परिषदा आणि सर्वपक्षीय बैठका घेत आहेत. परंतु या बैठकांमधून माओवाद्यांंशी चर्चा केली पाहिजे असा प्रस्ताव कधीच पुढे येत नाही. देशासमोरचे सर्वात मोठे संकट म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या संकटाचे निवारण करण्यासाठी या लोकशाहीवादी देशामध्ये चर्चेचे माध्यम पूर्णपणे बंद आहे. माओवाद्यांचा प्रश्‍न नेमका कसा सोडवावा याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांच्या पातळीवर प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. हा प्रश्‍न गोळीस गोळी या मार्गाने सुटेल की, चर्चेच्या मार्गाने सुटेल? याचे योग्य आकलन सरकारच्या पातळीवर झाले असल्याचे दिसत नाही.

सरकारने एक तर माओवाद्यांना दहशतवादी ठरवून त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू करावी आणि त्यांचे बंड संपवावे किंवा टोकाची शांततेची भूमिका घेऊन माओवाद्यांशी चर्चा करावी. या दोन्हींपैकी एक भूमिका घेतल्याशिवाय माओवाद्यांचे बंड संपणार नाही. पण सरकार या दोन्ही भूमिका घेत नाही. सरकारच्या पातळीवर हा प्रश्‍न कसा हाताळावा याबाबत विविध पातळ्यांवर गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत. परिणामी माओवाद्यांचे हल्ले जारी आहेत. छत्तीसगडमध्ये केलेल्या गंभीर स्वरूपाच्या हिंसक घटनेनंतर त्यांनी महाराष्ट्रात डोके वर काढले आहे आणि दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात एक पोलीस पाटील आणि खनिज कंपन्यांचे दोन अधिकारी अशा तिघांच्या हत्या केल्या. या घटनेच्या वेळी बिहारमध्ये असाच आणखी एक प्रकार सुरू होता. बिहारच्या जमुई रेल्वे स्थानकाजवळ धनबाद ते पटणा ही इंटरसिटी गाडी अडवून तिच्यावर सुमारे २०० नक्षलवादी एक तासभर तुफान गोळीबार करत होते. त्यांनी या मार्गाने ही रेल्वे दीड तास अडवून धरली. या गाडीतल्या सुरक्षा रक्षकांची शस्त्रे लुटली आणि गोळीबार करून तिघांना ठार केले. या देशात नक्षलवादी आणि माओवादी काहीही करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

छत्तीसगडमध्ये २९ जणांची हत्या करण्यात आल्याची घटना अजून जुनी झालेली नाही. तिच्यात जखमी झालेले माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले. या घटनेनंतर सुद्धा याच सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी सल्वा जुदुम या चळवळीतील आणखी एका नेत्याची हत्या केलेली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गृहमंत्र्यांनी, माओवादी संघटना आता निराश झाल्या आहेत, पोलिसांनी त्यांच्यावर आणलेल्या दबावामुळे ते अशी सामान्य माणसाला वेठीस धरणारी हिंसक कृत्ये करीत आहेत असे म्हटले. माओवादी खरोखरच निराश झाले आहेत का की, गृहमंत्र्यांनी नेहमीची छापील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे असा प्रश्‍न पडतो. कारण ते निराश झाले असते तर त्यांच्या कारवाया काही दिवस बंद पडल्या असत्या. पण त्यांच्या कारवाया जारीच आहेत. गडचिरोली जिल्ह्यात तर त्यांनी हैदराबादच्या हेमलता मिनरल्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन रेड्डी आणि लॉयर्ड मेटल्स् या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जसपालसिंग धिल्लन यांच्यासह त्या परिसरातील सुरजागड येथील पोलीस पाटील अशा तिघांच्या हत्या केल्या आहेत. लोह खनिजाचे उत्खनन करण्यात माओवाद्यांनी अडथळे आणू नयेत, यासाठी त्यांना खंडणी देण्यास गेले असता या तिघांची हत्या झाली. हे सारे प्रकार अस्वस्थ करणारे आहेत.