अडवाणींची व्यथा

एखाद्या एकत्रित कुटुंबात वृद्धांना आपले कोणी ऐकतच नाही असे सतत वाटत असते आणि या उपेक्षेने ते सतत चिडलेले असतात. भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी (वय 85) यांची अवस्था नेमकी अशीच झाली आहे. त्यांना गेल्या 10 वर्षांपासून रा. स्व. संघाने वाळीत टाकले आणि आता भाजपातही ते बाजूला फेकले गेले. आता आपला पक्ष आपल्याला पंतप्रधान करणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी पक्षाला सार्वजनिक दृष्ट्या आपल्या हातातल्या एकमेव राजीनामा अस्त्राचा वापर केला आहे. आपल्या या राजीनाम्याचा काहीही फायदा होणार नाही आणि आता मोदी यांची अडवाणींच्या मनाविरुद्ध झालेली प्रचार प्रमुख पदावरची निवड रद्द होणार नाही हे त्यांनाही चांगले माहीत आहे म्हणून त्यांनी चिडून पक्षाला अद्दल घडवून आपल्या मनाचे समाधान करून घेतले आहे. कर्नाटकात माजी मु‘यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी असाच पवित्रा घेतला होता. अडवाणी यापेक्षा काही वेगळे करीत नाहीत. अडवाणी झाले काय की येडीयुरप्पा झाले काय माणसाला अहंकाराची इंगळी डसली की चांगल्या वाइटातला फरक कळत नाही.

अडवाणी यांचा मोदी यांना विरोध आहे आणि पक्षाने त्यांच्या ऐवजी आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिक जागा मिळणार नाहीत आणि पक्ष त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर सत्तेवर येणार नाही असे अडवाणी यांचे म्हणणे आहे. कोणाचा विश्‍वास नाही कारण मोदी यांनी आपले इलेक्टोरल मेरीट निदान गुजरातेत तरी सिद्ध केले आहे आणि काही मतदार चाचण्यात मोदी भाजपाला लोकसभेच्या 200 जागा मिळवून देतील असे दिसून आले आहे. हा सारा अंदाज आहे. त्यावर विश्‍वास ठेवता कामा नये असे वादासाठी गृहित धरू. मोदी फार यशस्वी होणार नाहीत हे मान्य केले तरी मोदींशिवाय तेवढ्या ताकदीचा अन्य कोणता नेता भाजपात आहे ? मोदींना पर्याय काय ? अडवाणी हा मोदी यांचा पर्याय होऊ शकत नाही. मोदींची मूठ झाकलेली आहे हे नक्की माहीत नाही पण अडवाणींचा प्रभाव तेवढाही नाही हे सिद्ध झाले आहे. 2004 सालच्या लोकसभा निवडणुका प्रत्यक्षात अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या नव्हत्या.

त्यांच्या सरकारच्या कामावर त्या लढवल्या गेल्या होत्या. तेव्हा वाजपेयी यांचेही नाव वापरण्यात आले होते. 2004 साली झालेला भाजपाचा पराभव वाजपेयी आणि अडवाणी यांचा होता पण 2009 साली झालेला पराभव हा एकट्या अडवाणींचा होता. त्या वेळची निवडणूक पूर्णपणे अडवाणी यांच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली होती. 2004 ते 2009 या पाव वर्षात मनमोहनसिंग सरकारच्या अनेक दोषांमुळे देशात सरकारच्या विरोधात वातावरण होते पण, अशा वातावरणातही त्या सरकारचा पराभव तर झालाच नाही पण त्याच्या जागा 143 वरून 206 वर गेल्या. अशा स्थितीत अडवाणी आपल्या नेतृत्वाचा दावा कशाच्या जोरावर करीत आहेत असा संघाचा प्रश्‍न आहे आणि अडवाणी यांच्या कडे त्याचे बिनतोड उत्तर नाही. असा कसलाही प्रश्‍न न विचारता संघाने आपल्याला पंतप्रधान म्हणून पुढे करावे असे अडवाणी यांचे म्हणणे आहे पण संघ नेते तसे करीत नाहीत हे अडवाणी यांचे दु:ख आहे. आताच मोदी यांना कोणत्या तरी वरिष्ठ पदावर नेमण्याची घाई करू नये असे त्यांचे म्हणणे होते. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी याबाबत घाई केली असा अडवाणी यांचा त्यांच्यावर आरोप आहे.

अर्थात मुळात राजनाथसिंह यांची अध्यक्षपदावर झालेली निवड अडवाणी यांना पसंत नव्हती. नितीन गडकरी यांना दुसर्‍यांदा अध्यक्ष करायचे नाही असे पक्षाने ठरवले तेव्हा अडवाणी गडकरी यांच्या विरोधात होते. पण त्यांना हटवून अनंत कुमार किंवा सुषमा स्वराज यांना अध्यक्ष करावे असे अडवाणी यांचे मत होते पण संघाने त्यांची ही सूचना फेटाळली आणि राजनाथसिंह यांना अध्यक्ष केले हे अडवाणी यांना आवडले नाही. आता मात्र अडवाणी यांच्या मनात गडकरी यांच्या विषयी प्रेम निर्माण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत पाच राज्यांत होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांत गडकरी आणि मोदी या दोघांवर जबाबदारी टाकावी अशी सूचना अडवाणी यांनी केली होती पण हीही सूचना नाकारण्यात आली. अडवाणी यांच्या सूचना एकामागे एका डावलण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. आपली एकही सूचना मानली जात नाही याचा अर्थ आपल्याला अपमानित करण्यात येत आहे. मग आपण पक्षाच्या पदांवर राहायचे कशाला असा त्यांचा प्रश्‍न आहे. राजनाथसिंह यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण अडवाणी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी प्रत्येक विषय आपल्या अहंकाराचा केला आहे.

Leave a Comment