चीनी ग्रेट वॉल मोटर्सचा पुण्यात उत्पादन प्रकल्प

पुणे दि.१० – चीनमधील सर्वात मोठी एसयूव्ही कार मेकर कंपनी ग्रेट वॉल्स भारतीय भूमीवर आपला उत्पादन प्रकल्प उभारणारी पहिली कंपनी ठरली आहे. ही कंपनी पुण्यात आपला उत्पादन प्रकल्प सुरू करत असून या प्रकल्पातून २०१६ सालापासून उत्पादन सुरू होत असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनी त्याचबरोबर ग्रेट वॉल त्यांची जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेली हावेल एच पाच कारही भारतात लाँच करणार आहे.

ग्रेट वॉलने त्यांच्या ऊत्पादन प्रकल्पासाठी प्रथम गुजराथ आणि तमीळनाडू राज्यांचा विचार केला होता. मात्र महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या सवलती पाहून त्यांनी महाराष्ट्रात हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पासाठी पुण्याची निवड केली. पुण्याची निवड करताना चीन सरकारच्या मालकीच्या बेकी फोटोन मोटर्सने पुण्याजवळच्या खेड येथे व्यावसायिक वाहन सुविधा प्रकल्प उभारण्याचा घेतलेला निर्णयही ग्रेट वॉलने लक्षात घेतला होता असे कंपनीतील वरीष्ठ अधिकार्यांरनी सांगितले.

कंपनीचे वरीष्ठ अधिकारी कांही दिवसांपूर्वीच भारतात येऊन येथील बाजारपेठेचा आढावा घेऊन गेले असल्याचेही समजते. २०१४ साली दिल्लीत भरत असलेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात ग्रेट वॉल त्यांची हावेल एच ५ एस यूव्ही व अन्य कांही मॉडेल्स सादर करणार असल्याचेही सांगितले गेले आहे. मात्र भारतात प्रकल्प उभारताना कंपनीने संयुक्त सहकार्य प्रकल्पाचा विचार केलेला नाही तर संपूर्णपणे स्वतःच्या मालकीचाच प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजते.