आता लढण्यासाठी सज्ज सोल्जर रोबो

नवी दिल्ली दि.१० – भविष्यातील युद्धे ही मानवरहित युद्धे असणार हे लक्षात घेऊन डीआरडीओने अतिशय बुद्धिमान, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार्‍या सोल्जर रोबोचे निर्माण कार्य हाती घेतले असून येत्या १० वर्षात हे रोबो सैनिक आघाडीवर तैनात होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळ सीमाभागासारख्या धोक्याच्या ठिकाणी प्राण गमवावे लागण्याची वेळ सैनिकांवर येणार नाही अशी आशा आहे.

डीआरडीओची सूत्रे नुकतीच हाती घेतलेले अविनाश चंदर या विषयी बोलताना म्हणाले की डीआडीओच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील अनेक प्रयोगशाळातून सोल्जर रोबो बनविण्याच्या कामी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. भविष्यातील युद्धे ही आकाश व जमिनीवरही मानवरहित युद्धेच असणार आहेत. त्यादृष्टीने हे रोबो तयार करण्यात येत असून एलओसी वर ते तैनात करता येणार आहेत.

सध्याही सैनिक रोबो आहेत मात्र ते सैनिकांना मदत करणारे रोबो आहेत. म्हणजे सैनिक जो आदेश देईल त्यानुसार ते कारवाई करतात मात्र नवे रोबो हे स्वतः विचार करू शकणार आहेत तसेच मित्र आणि शत्रूतील फरकही अचूक ओळखू शकणार आहेत. म्हणजेच भविष्यात फ्रंटवर हे रोबो पुढे असतील आणि सैनिक त्यांना सहाय्य करतील असे चित्र असेल. सध्या बॉम्ब निकामी करणे, हाय रेडिएशन भागात जाणे यासाठी रोबोंचा वापर केला जात आहे. सोल्जर रोबो ही त्याच्या पुढची पायरी आहे.

जगभरातील अनेक देशांनी सोल्जर रोबो बनविण्याचे तंत्रज्ञान वापरात आणले असून त्यात चांगली प्रगती केली आहे आणि आता भारतही अशा देशांच्या पंगतीत बसला आहे असेही चंदर यांनी सांगितले.

Leave a Comment