नवी दिल्ली- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याची दिल्ली पोलिसांनी तब्बल १२ तास कसून चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाशी त्याचा संबध असल्याचे लक्षात येत असल्याने दिल्ली पोलिसांनी त्याला देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. कुंद्राचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून गुरुवारी पुन्हा त्याची चौकशी केली जाणार आहे. राज कुंद्रा हा राजस्थान रॉयल्स संघाचा मालक आहे. खेळाडूंनंतर आता थेट मालकच या प्रकरणात अडकत चालल्याने संपूर्ण आयपीएल स्पर्धेवरचाच डाग आणखी गडद होत चालला आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाच्या श्रीशांत, अंकित चव्हाण आणि चंडिला या तिघा खेळाडूंना अटक करण्यात आली होती.
राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू सिद्धार्थ त्रिवेदी या प्रकरणात तपास पक्षाचा साक्षीदार आहे. त्याच्या जबानीत नाव आल्याने पोलिसांनी कुंद्रा आणि गोएंका यांना चौकशीला पाचारण केले.दिल्ली पोलिसांनी बुधवारी राज कुंद्रा आणि त्याचा बिझनेस पार्टनर व मित्र उमेश गोयका याची तब्बल १२ तास कसून चौकशी केली. त्रिवेदीने केलेले दावे तपासणे आणि एकूणच एखाद्या संघाच्या मालकीचा पॅटर्न कसा असतो, हे जाणून घेण्यासाठी ही चौकशी झाल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.
राज कुंद्रा हाही सट्टा खेळत होता, असा संशय पोलिसांना असून त्यामुळेच त्याचा पासपोर्ट जमा करुन घेण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील आदेश मिळेपर्यंत कुंद्राला देश सोडता येणार नाही, अशी सख्त ताकीदही देण्यात आली आहे. कुंद्रा यांना आत्ताच ‘क्लीन चिट’ देता येणार नाही, असे सांगून, दिल्ली पोलिसांतील एका वरिष्ठ अधिका-याने ‘कुंद्रा ही तपासासाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे,’ असे सूचक वक्तव्य केले होते.