धकधक गर्लला करायचाय श्रीदेवीसोबत चित्रपट

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि रूप की राणी श्रीदेवी या कधीकाळी एकमेकींच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अभिनेत्रींना लवकरच पडद्यावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे. खुद्द माधुरीनेच श्रीदेवीसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करून तसे संकेत दिले आहेत. ऐंशी व नव्वदच्या दशकामध्ये टॉपच्या नट्यांमध्ये समावेश असलेल्या श्रीदेवी आणि माधुरी यांच्यामध्ये प्रचंड चढाओढ होती. या दोघीही नंबर वन नटीच्या पदावर आपला दावा करत होत्या. बहुधा त्यांच्यातील या स्पर्धेमुळे त्यांनी कधीच एकत्र चित्रपट केला नाही. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या दोघींचेही आता उमेदीचे दिवस संपले आहेत.

श्रीदेवीने तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक केले तर माधुरीने सहा वर्षांनी जवानी है दिवानीद्वारे अभिनयाची कारकीर्द नव्याने सुरू केली आहे. संसाराला लागलेल्या या दोन्ही प्रचंड ताकदीच्या अभिनेत्रींमध्ये पूर्वीची तेढ उरली नसल्याने माधुरीने श्रीदेवीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माधुरी सांगते की, श्रीदेवीसोबत काम करण्याची माझी मनापासूनची इच्छा आहे. अर्थात एखाद्या चित्रपटाची कथा आम्हा दोघींना पसंत पडेल तेव्हाच हे घडू
शकेल. श्रीदेवीच नव्हे तर आपली आणखी एक प्रतिस्पर्धी राहिलेल्या जुही चावलासोबतही माधुरी पहिल्यांदाच काम करत आहे. माधुरी व जुही सौमिक सेन दिग्दर्शित करत असलेल्या गुलाब गँगमध्ये एकत्र येत असून या चित्रपटात जुही नकारात्मक पात्र साकारत आहे. माधुरी व जुहीसोबत या चित्रपटात माही गिल आणि हुमा कुरेशी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment