मान्सून कर्नाटकात दाखल, दोनच दिवसात महाराष्ट्रात

पुणे. दि 3 (प्रतिनिधी)-केरळमध्ये दि.1 जूनला आलेला मान्सून आज कर्नाटकात दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसात तो दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच आंध्रप्रदेश व बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान खात्याच्या उपमहासंचालक डॉ मेधा खोले यांनी सांगितले.

मान्सूनने सोमवारी उत्तर कर्नाटकाचा काही भाग व रायलसीमेचा काही भाग व्यापला होता. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मान्सून महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने अगोदरच स्पष्ट केले आहे. काल राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोंकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली होती.सर्वाधीक तापमान राज्यात काल चंद्रपुर येथे 43.5 अंश सेल्सियस नोंदवले गेले.