पात्रता नसतानाही प्राध्यापक लुटत आहेत शासनाच्या सुविधा

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) -पुणे विभागातील वरिष्ठ महाविद्यालयातील 80 प्राध्यापक पी.एचडी आणि सेट-नेट पात्रता पूर्ण नसतानाही शासनाच्या आर्थिक सेवासुविधांचा लाभ व वेतन घेत असल्याचे उघड झाले आहे. प्राध्यापकांनी तब्बल 96 दिवसांचा संप पुकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने आता अशा प्राध्यापकांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून अधिकची र्नकम वसूल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आर्थिक सेवासुविधांचा लाभ शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याच्या दिनांकापासून न घेता ज्या प्राध्यापकांनी सेवेत रूजू झाल्याच्या तारखेपासून घेतला आहे, त्याची माहिती उच्च शिक्षण विभागाने मागविली होती. त्यात पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे विभागातही तब्बल 80 प्राध्यापक शैक्षणिक पात्रता पूर्ण न करता शासनाच्या आर्थिक सर्व सुविधांचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

नियमित प्राध्यापकासाठी सेट-नेट उत्तीर्ण होणे किंवा पीएच.डी. पदवी प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु, एकही पदवी धारण न करता सेवेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले, त्यांनी काही वर्षांनी सेट-नेट अथवा पीएच.डी. पदवी प्राप्त केली. अशा प्राध्यापकांनी पीएच.डी. पदवी मिळविलेल्या तारखेपासून आर्थिक लाभ घेणे आवश्यक होते. पंरतु काही प्राध्यापकांनी सेवेत रूजू झाल्याच्या तारखेपासून आर्थिक लाभ घेतल्याचे निदर्शनास आले होते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 34, नगरमधील 18 आणि नाशिकमधील 34 प्राध्यापकांचा समावेश आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणार्‍या अशा प्राध्यापकांची माहिती मागविली. त्यात पुणे विभागातही अशा प्राध्यापकांची संख्या आढळून आली. आता ही सर्व माहिती येत्या दोन दिवसांत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

यासंदर्भात पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक सुनील शेटे म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार तीन जिल्ह्यातून ही माहिती संकलित करण्यात आली. त्यात 4 एप्रिल 2000 पासून आतापर्यंत 80 प्राध्यापकांनी अद्यापही शैक्षणिक पात्रता पूर्ण केली नाही. तरी शासनाच्या सर्व सुविधा घेत आहेत. बहुतांश प्राध्यापक एम.फिल पूर्ण केली आहेत. याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.