अजय शिर्के, संजय जगदाळे यांनी दिले राजीनामे

नवी दिल्ली, दि.31 – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदाळे आणि शिर्के यांच्या राजीनाम्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जगदाळे आणि शिर्के यांनी राजीनामा दिला आहे. अजय शिर्के यांनी बीसीसीआयच्या खजिनदारपदाचा तर संजय जगदाळे यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी हे राजीनामा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन अजुनही राजीनामा न देण्यावर अडून बसले आहेत.

बीसीसीआयच्या दोन पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे सोपवल्याने हे निश्चित श्रीनिवासन यांना अडचणीचं ठरणार आहे. श्रीनिवासन यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्याच्या दिशेने हे प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.

श्रीनिवासन यांनी वेळोवेळी आपली काहीही चूक नसल्याने आपण राजीनामा देणार नसल्याचं ठासून सांगितलं आहे. मात्र श्रीनिवासन यांची अडचण आता होतांना दिसतेय. राष्ट्रवादीकडून सर्वात आधी डी.पी.त्रिपाठी यांनी श्रीनिवासन यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

मात्र राष्ट्रवादी पक्ष हा बीसीसीआयचा सदस्य नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मागणीचा विचार करणार नसल्याचं श्रीनिवासन यांनी म्हटलं होतं. यानंतर पवारांनीही आपण बीसीसीआय अध्ययक्ष राहिलो असतो, तर असं झालं नसतं असं सांगितलं, यानंतर आज राष्ट्रवादीकडून पुन्हा बीसीसीआयच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

अर्थात अजय शिर्के यांनी घेतलेली ही भूमिका बीसीसीआयच्या हिताखातर आहे की बीसीसीआयमधील अंतर्गत राजकारणाचा भाग? या विषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अजय शिर्के हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचेही अध्यक्ष असून शरद पवारांचे निकटवर्तीयही आहेत. यामुळे हातच राखूनच त्यांनी आपली भूमिका मीडियासमोर मांडली होती.

Leave a Comment