
लंडन, दि.28- कर्करोग, एड्स, टीबी, मलेरिया यांसह अनेक जीवघेण्या रोगांचे निदान अवघ्या दहा मिनिटात करता येईल, अशाप्रकारचे मशीन तयार केले असल्याचा दावा एका ब्रिटीश शास्त्रज्ञाने केला आहे. क्यू- पीओसी नावाची मशीन सुमारे 500 पौंड म्हणजे 42 हजार रुपये किंमतीची आहे, ती या रोगांच्या तपासणीत डॉक्टरांना निदान करण्यात आणि उपचार पद्धती समजून घेण्यात मदत होईल, असेही सांगितले आहे. 37 वर्षीय जोनाथन ओ हैलोरान यांनी आपल्या घरातच सुरू केलेल्या प्रयोगशाळेत अशाप्रकारचे मशीन विकसीत केले आहे. हे मशीन ट्यूमर आणि इतर अनुवांशिक आजारांच्या लक्षणांचे सुक्ष्म विश्लेषण करू शकणार आहे. त्यांनी डीएनए सारख्या क्लिष्ट चाचण्याही सहज करता येतील आणि त्याचे निदानही करता येईल असा दावा केला आहे. तसेच या डीएनए चाचणीमध्ये कर्करोग वाढण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, आणि ट्यूमरला नष्ट करण्यासाठी कोणते औषध उपयोगी पडेल यासंबंधीही माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले.
