मी मराठा असतो तर मुख्यमंत्री असतो

नाशिक, दि. 27 – सध्या सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. नाशिकमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या वंजारी समाजाच्या मेळाव्यात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मी मराठा असतो, तर नक्की मुख्यमंत्री झालो असतो’ असे वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मुंडे सध्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. सत्ताधार्‍यांना टार्गेट करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अशातच त्यांनी सोमवारी नाशिकमध्ये वंजारी समाजाच्या मेळाव्यात असे खळबळजनक वक्तव्य केले. वंजारी समाजाचा असल्याने, मुख्यमंत्री झालो नाही, अशी मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. मी मराठा असतो, तर नक्की मुख्यमंत्री झालो असतो, असे उद्गार काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामागे त्यांची कोणती राजकीय महत्त्वाकांक्षा लपली आहे, हे सूचित होते. यावेळी मुंडेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले.

मराठा आरक्षण हवेच, मात्र आमचे आरक्षण कोणी घेऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्यावर सध्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बळकट करण्याची जबाबादारी देण्यात आलेली आहे. गडकरी आणि मुंडे यांच्यातून विस्तव जात नसताना, मुरब्बी राजकारण्याप्रमाणे या वादातून वाट काढत गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांना मिळणे हीदेखील मुंडे गटाचीच सरशी मानली जात आहे. आता मुंडे राज्याच्या राजकारणात भाजपला बळकट करता करता स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील का? हे आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र, मुंडे यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळण्यास सुरुवात होणार हे निश्‍चित

Leave a Comment