अमेरिकेतील आऊट सोअर्सिंग फर्म आयगेटने नुकत्याच निलंबित केलेल्या सीइओ फनीश मूर्ती यांना कंपनीने करार समाप्तीनंतर मिळणारी फायदा रक्कम न देण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम आहे तब्बल १५.०९ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ८४ कोटी रूपये. मूर्ती यांना व्यावसायिक गैरवर्तणुकीबद्दल निलंबित केले असल्याने ही रक्कम त्यांना देता येणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मात्र कंपनी कराराप्रमाणे त्यांना दरमहा ६ हजार डॉलर्स पोस्ट टर्मिनेशन फायदा म्हणून आजन्म दिले जाणार आहेत. या संबंधात आय गेट च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या संबंधीचा नवा करार नुकताच कंपनीने मूर्ती यांच्याशी केला होता. त्यानुसार ही रक्कम त्यांना अथवा त्यांच्या पत्नीला वयाच्या ६५ वर्षांपर्यंत दिली जाणार आहे. त्यांचे निलंबन कोणत्याही कारणाविना केले गेले असते तर त्यांना बारा महिन्यांच्या पगाराइतकी म्हणजे १० लाख डॉलर्स इतकी रक्कम भरपाई म्हणून दिली गेली असती.
मात्र मूर्ती यांनी आपल्या कलिग बरोबर असलेले संबंध लपविले आहेत अणि लैंगिक अत्याचारासारखा प्रकार केला आहे त्यामुळे त्यांचे निलंबन केले गेले आहे. त्यामुळे करार समाप्तीनंतरची फायदा रक्कम त्यांना दिली जाणार नाही. २००२ साली मूर्ती यांना याच कारणावरून इन्फोसिस मधून हकलले गेले होते आणि त्यांच्यावर दावा दाखल करण्यात आला होता. मात्र न्यांयालयाबाहेर तडजोड करून हे प्रकरण मिटविले गेले होते.