‘ रायगड ’ अखेर प्रतिभाताईंच्या ताब्यात

पुणे दि.२३- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची रिटायरमेंट होमची दीर्घकाळ चाललेली प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. पुणे येथील पाषाण रोड परिसरात असलेला रायगड बंगला नूतनीकरण करून आता त्यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे समजते. कोणत्याही क्षणी त्या तेथे राहायला येऊ शकतात. सध्या त्यांचे वास्तव २ तुघलख रोड, दिल्ली येथे आहे.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने वायरलेस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या बंगल्याचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण केले असून पुणे महापालिकेकडून कंप्लिशन सर्टिफिकेटही मिळविले आहे. त्यानंतरच या बंगल्याच्या किल्या प्रतिभाताईंकडे सोपविल्या गेल्या आहेत. त्या किवा त्यांचे पती जिवंत असेपर्यंत त्यांच्याकडे या बंगल्याचा ताबा राहणार असून नंतर तो महाराष्ट्र शासनाला दिला जाणार आहे.

या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी २ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. मूळच्या बांधकामात नवे बांधकामही करण्यात आले आहे. बंगल्याचा एरिया आता सहा हजार चौरस फूट इतका झाला आहे. यात कांही नवीन खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. तीन बेडरूम्स, लिव्हिंग रूम, लाऊंज, डायनिग रूम, ड्रेसिग रूम, लायब्ररी, पूजा खोली, किचन, स्टोअर रूम, व्हिजिटर्स लाऊंज, प्रतिभाताईंचे कार्यालय, त्यांच्या स्वीय सहाय्यकाचे कार्यालय, पोर्च, कोर्ट यार्ड, पाच टॉयलेट आणि पाच स्टाफ क्वार्टर्स असा बंगल्याचा आराखडा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच प्रतिभाताई त्यांच्या जावयासमवेत बंगल्याची पाहणी करून गेल्याचेही समजते.

राष्ट्रपती पेन्शन नियमानुसार राष्ट्रपतीपदाची कारकीर्द संपल्यानंतर दोन हजार स्क्वेअर फूट बंगला राष्ट्रपतींना देता येतो. मात्र प्रतिभाताईंचा हा नवा बंगला मान्य आकारापेक्षा तिपटीने मोठा आह. शिवाय त्याला सुरक्षेच्या कारणांनी तटबंदीही करण्यात आली असून गार्डची दोन ठाणी तसेच सुरक्षा रक्षकांची ठाणीही बांधण्यात आली आहेत.

Leave a Comment