नवीन जातीच्या आंब्याला दिले ‘ निर्भया‘ चे नांव

लखनौ दि.२३ -उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आंबा केंद्र – मलिहाबाद यांनी नवीन जातीच्या आंब्यासाठी निर्भया हे नांव दिले आहे. १६ डिसेंबर रोजी घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणाचा बळी ठरलेली तेवीस वर्षीय फिजिओथेरपिस्ट तरूणी निर्भया हिच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नांव देण्यात आले असल्याचे ही आंबा जात विकसित करणारे आंबा उत्पादक किलीमुल्ला खान यांनी सांगितले.

गँगरेप प्रकरणात बळी गेलेल्या या तरूणीने दाखविलेले धैर्य आणि शौर्य सार्या् देशाला प्रेरणादायी ठरले आहे. बलात्काराची ही अमानुष घटना सार्‍या देशाला ढवळून काढणारी ठरली आणि म्हणूनच या तरूणीला सलाम करण्यासाठी आंब्याची ही नवी जात तिच्या नावाने प्रसिद्ध व्हावी अशी आपली इच्छा होती असेही खान म्हणाले.

खान यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने यापूर्वी गौरवले आहे. एकाच झाडावर तीनशे वेगवेगळ्या जातीचे आंबे आणण्याची किमया केल्याबद्दल त्यांचे नांव लिम्का बुक मध्येही नोंदविले गेले आहे. त्यापूर्वी त्यांनी १९९९ साली एकाच झाडावर ५४ प्रकारचे आंबे उत्पादित केले होते आणि हे झाड राष्ट्रपतींना भेट दिले होते. हे झाड आजही राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डन मध्ये आहे.

खान या नव्या जातीविषयी सांगताता म्हणाले की हे झाड त्यांनी तीन वर्षांपूर्वी लावले आणि त्याला इतक्या थोड्या काळात फळे धरली. यावर्षी फळांचा आकार छोटा आहे पण पुढील वर्षात ही फळे आकाराने मोठी असतील. यापूर्वीही खान यांनी नवीन विविध जातीच्या आंब्याना ऐश्वर्या, नर्गीस अशी सेलब्रिटींची तसेच सोनिया गांधी, अखिलेश यादव यासारख्या राजकीय नेत्यांची नांवेही दिली आहेत.

Leave a Comment