आता तुम्ही थांबा, राहुलबाबांना संधी द्या – कमलनाथ

नवी दिल्ली, दि.२३ – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दहा वर्षे पंतप्रधानपद संभाळले असल्याने आता राहुल यांच्याकडे नेतृत्त्व द्यावे, आता तुम्ही थांबा, पंतप्रधानपद राहुलबाबांकडे द्या, असे मत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.

कमलनाथ पुढे म्हणाले की, अनेक संकटांना तोंड देत यूपीए- २ सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. काँग्रेस पक्षाने राहुल यांना पुढे केले पाहिजे. राहुल हे सध्या काँग्रेस पक्षात नंबर दोनचे नेते आहेत. तसेच पक्षाचे उपाध्यक्ष असल्याने पंतप्रधानपदासाठी त्यांचेच नाव पुढे येणे अपेक्षित आहे. जर, काँग्रेसने राहुल यांच्यासारख्या युवा नेत्यास पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले तर काँग्रेस पक्ष २०१४ मध्ये पुन्हा सत्तेवर येईल.

काही दिवसापूर्वीच खुद्द डॉ. मनमोहनसिंग यांनी आपण सलग तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधानपद भूषविण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ यांच्या वक्तव्यामागे भविष्यातील राजकीय उलथापालथीचेच दर्शन घडत आहे.

दरम्यान, काल झालेल्या भाजपच्या बैठकीत लोकसभेतील नेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. स्वराज म्हणाल्या, मला दुर्देवाने म्हणावे लागत आहे की, पंतप्रधान मनमोहनसिंग हे राजकीय नेते नाहीत. ते कोणताही निर्णय घेत नाहीत. तसेच प्रत्येक निर्णयावेळी ते सोनियांकडे पाहतात.

Leave a Comment