स्पॉट फिक्सिंग प्रकरणात साक्षी धोनीचीही चौकशी?

मुंबई दि. २२- आयपीएल सहा सिरीजमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात काल दारासिंग यांचा मुलगा विदू दारासिंग याला अटक करण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हा अन्वेषण विभाग भारतीय कप्तान महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हिचीही चौकशी करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्याच्यावेळी साक्षी, धोनीचा मॅनेजर आणि विदू दारासिंग एकमेकांजवळ बसून सामना पाहात असल्याचे व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले आहे. हे तिघे एकत्र दिसल्याने पोलिसांची नजर आता साक्षीकडेही वळली आहे. धोनी बॅटिंग करत असताना या तिघांत संभाषणही सुरू होते असेही चित्रीकरणात दिसले आहे.

विंदूला बुकी आणि मध्यस्तांच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून त्याच्या जुहू येथील निवासस्थानी अटक करण्यात आली आणि त्याची चौकशी झाली. तेव्हा त्याने आपला बेटींगशी संबंध असल्याचेही मान्य केले आहे असे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. १४ मे रोजी अटक करण्यात आलेल्या रमेश व्यास या बुकीकडून विदूचे नांव पोलिसांना समजले होते असेही समजते.

Leave a Comment