पंजाबविरुद्ध राजस्थान ठरले किंग्ज

चंडीगड- राजस्थान रॉयल्सने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ विकेट्सनी मात करत प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. वेगवान गोलंदाज केव्हॉन कूपरच्या तीन विकेट्स आणि अजिंक्य रहाणेचे सलग तिसरे अर्धशतक हे राजस्थानच्या सलग तिस-या विजयाचे विशेष ठरले. विजयासाठी 146 धावांचे आव्हान राजस्थानने एक षटक राखून पार केले. रहाणेने 49 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा फटकवल्या. सलग दुस-या लढतीत विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा मान त्याला मिळवता आला.

शेन वॉटसन (25 चेंडूंत 31 धावा) आणि संजू सॅमसन (33 चेंडूंत नाबाद 47 धावा) यांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. कर्णधार राहुल द्रविड (4)मात्र अपयशी ठरला. त्याला दुस-याच षटकात डावखुरा फिरकीपटू बिपुल शर्मानेबाद केले.विशेष म्हणजे बिपुलने यंदाच्या हंगामात पहिलीच लढत खेळताना प्रभाव (चार षटकांत 21 धावा) पाडला. मात्र पंजाबच्या अन्य गोलंदाजांना यश लाभले नाही.

तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पंजाबचानियमित कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टने या लढतीतून यशस्वी पुनरागमन केले. त्याने 32 चेंडूंत 42 धावा फटकवताना शॉन मार्शसह (64 चेंडूंत 77 धावा) दुस-या विकेटसाठी 102धावांची दणदणीत भागीदारी केली. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना अवघे 78 चेंडू लागले. पंजाब मोठया धावसंख्येकडे वाटचाल करतानाचे चित्र असताना कूपरने 13व्या षटकात गिलख्रिस्टला बाद करत धावसंख्येला आळा घातला. त्यानंतर मार्शला उर्वरीत षटकांत मोठी फटकेबाजी करता आली नाही. अन्य फलंदाजांनीही निराशा केल्याने पंजाब दीडशेचाही पल्ला गाठू शकला नाही.