बेंगळूरू-कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली असून सत्ता मिळविण्यात ते यशस्वी होणार असे दिसते आहे. सत्ताधारी भाजप तिस-या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर येडियुरप्पांनी बाजी मारत विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याचे सूत्र हाती घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. बेळगाव आणि सीमेलगतच्या मराठी भाषिक भागात महाराष्ट्रीय एकीकरण समितीने आघाडी घेतली आहे. यावेळेस विरोधी पक्ष म्हणून जेडीएसला संधी मिळणार आहे.
बुधवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेसने आघाडी घेतली होती. सुरुवातीचे कौल हाती आले असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फटका बसल्याचे चित्र आहे. भाजप सध्या ३९जागांवर आघाडीवर असून कॉंग्रेस १११ जागांवर पुढे आहे. माजी मुख्य मंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या केजीपीला १४ ठिकाणी आघडी आहे. स्वतः येडियुरप्पा यांना शिकारपुरा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.
काँग्रेसने भाजपला जोरात धक्का देत सत्तेतून खाली खेचल्याचे दिसत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मात्र येडियुरप्पांचा फटका बसलेला दिसत आहे. जेडीएसला ४२ ठिकाणी आघाडी आहे. जेडीएसने अनपेक्षितरित्या आघाडी घेतली आहे. अर्थात हा भाजपलाच बसलेला फटका आहे. जेडीएस राज्यात दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.
बेळगाव आणि सीमेलगतच्या मराठी भाषिक भागात महाराष्ट्रीय एकीकरण समितीचे संभाजी पाटील, किणीकर, अरविंद पाटील असे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे बेळगावात मराठी राज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.