‘तात्या विंचू’…परत येतोय..

‘तात्या विंचू’…नुसता पडदयावर आणि प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘झपाटलेला’ या महेश कोठारे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटातला ‘तात्या विंचू’ हा बाहुला आजही मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढाच लोकपिय आहे. ‘ओम भगभूगे भगनी भागोदरी ओम फट् स्वाहा’ असा विचित्र मृत्युंजय मंत्र म्हणत ‘तात्या विंचू’ने मृत्यूवरही विजय मिळवला होता. श्रीरंगपूर गावात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱया लक्ष्याच्या आयुष्यात धुमाकूळ घालणाऱया आणि त्याच्या जीवावर बेतलेल्या ‘तात्या विंचू’चा खातमा करण्यात इन्स्पेक्टर महेश जाधवला यश येते आणि लक्ष्यासह पेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतात पण हाच ‘तात्या विंचू’ आता परत येतोय.. असे म्हटल्यास प्रेक्षकांना नक्कीच श्वास रोखून धरावा लागेल, आणि आता तर तो भेटणार आहे चक्क थ्रीडी स्वरूपात..!

दिग्दर्शक महेश कोठारे यांचा महत्त्वाकांक्षी ‘झपाटलेला 2’हा मराठीतला पहिला थ्रीडी आणि सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचा थ्रीडीमधील फर्स्ट लुक नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमच दाखविण्यात आला. यावेळी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सहकलाकार दिपक शिर्के, विजय पटवर्धन, शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि ‘व्हायकॉम 18’च्या व्यावसायिक आणि प्रादेशिक चित्रपट विभागाचे संचालक जयेश मुजूमदार आदि मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटात आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली यांच्यासोबत सई ताम्हणकर, मधु कांबीकर, सुनील तावडे, दिलीप पभावळकर अशा कसलेल्या कलाकारांची अदाकारी पहायला मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या चित्रपटाचं छायांकन सुरेश देशमाने यांनी केले आहे. धमाल गाणी आणि संगीत हे महेश कोठारेंच्या चित्रपटाचं नेहमीच आकर्षण असतं, ते याही चित्रपटात बघायला मिळणार आहे. ‘झपाटलेला 2’ची गाणी गुरु ठाकूर यांनी लिहीली असून अवधूत गुप्ते यांनी ती संगीतबध्द केली आहेत. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव आणि फुलवा खामकर यांनी चित्रपटातील गीतांवर कोरीओग्राफी केली आहे. ‘झपाटलेला 2’च्या प्रॉडक्शन डिझाईनची महत्त्वपूर्ण जबाबदारी नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. ‘व्हायकॉम 18’ आणि मुव्हींग पिक्चर्स पस्तुत ‘झपाटलेला 2’ या चित्रपटाची निर्मिती ‘कोठारे ऍण्ड कोठारे व्हिजन’ या निर्मिती संस्थेद्वारे करण्यात आली आहे. नव्वदच्या दशकात पदर्शित झालेल्या ‘झपाटलेला’ चित्रपटाने लोकपियतेचे सर्व उच्चांक गाठले होते. अनेक शहरात या चित्रपटाने हाऊसफुल्लसोबतच सिल्वर आणि गोल्डन ज्युबलीचे मानाचे फलक झळकवले होते. इन्स्पेक्टर महेश जाधव यांच्या अचूक नेमाने संपलेला ‘तात्या विंचू’ परत जिवंत होऊन कसा येणार याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे आणि ही उत्सुकताच या चित्रपटाचा ‘युएसपी’ ठरणार आहे. भारतीय सिनेमा 100 वर्ष पूर्ण करीत असताना, मराठीतला पहिला थ्रीडी सिनेमा, भव्य स्वरुपात मराठी रुपेरी पडद्यावर झळकतोय या विषयीचा आनंद महेश कोठारे यांनी व्यक्त केला. महेश कोठारे चित्रपटात कमिशनर जाधवच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.

मराठी चित्रपटांची वाढती लोकपियता आणि व्यापकता याचा अभ्यास करुन ‘व्हायकॉम 18’ने प्रादेशिक चित्रपटांच्या क्षेत्रात प्रवेश केला. ‘झपाटलेला 2’ या पहिल्या थ्रीडी मराठी चित्रपटातून खूप चांगली सुरुवात होईल, असा दृढ विश्वास ‘व्हायकॉम 18’च्या व्यावसायिक आणि प्रादेशिक चित्रपट विभागाचे संचालक जयेश मुजूमदार यांनी व्यक्त केला. यावेळी बोलतांना त्यांनी ‘व्हायकॉम 18’च्या आगामी ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटासोबत ‘झपाटलेला 2’ चा फर्स्ट लुक संपूर्ण भारतातल्या चित्रपटगृहांत बघायला मिळणार आहे, अशी माहिती दिली. ‘झपाटलेला’चा दुसरा भाग बनवण्याची इच्छा कोठारे यांच्या मनात अनेक वर्षांपासून होती. ‘झपाटलेला’चा सिक्वल बनावा पण तो वेगळया रंगात आणि ढंगात अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे हा चित्रपट थ्रीडीमध्ये करण्याचे त्यांनी ठरवले. थ्रीडी कॅमेरे, परदेशी तंत्रज्ञ यांच्या साहयाने ‘झपाटलेला 2’ तयार झाला. स्पेनचे प्रसिध्द स्टिरिओग्राफर ऐनरिके किआडो यांच्या तंत्राची जादू या चित्रपटात बघायला मिळणार आहे. शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्या सहाय्याने ‘तात्या विंचू’चा नवा लूक आणि नव्या करामती तयार करण्यात आल्या आणि आता हा चित्रपट ‘तात्या विंचू’सह पुन्हा एकदा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी 7 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.