हॉवर्ड येथील संशोधकांनी छेाट्या माशीच्या आकाराचा रोबोचे डिझाईन, उत्पादन आणि त्याचे हवेतील उड्डाण यशस्वी करण्यात यश मिळविले असून हे यश म्हणजे गेल्या दहा वर्षात सातत्याने सुरू असलेल्या संशोधनाचा विजय आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. या एरियल रोबोचे प्रात्यक्षिक नुकतेच सादर करण्यात आले. हॉवर्ड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड अप्लाईड सायन्सेस व वास इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त संशोधनातून हे यश मिळाले आहे.
रोबो बी प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक रॉबर्ट वूड यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी गेली १२ वर्षे सतत घेतलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. नखाच्या आकाराची किरकोळ वाटणारी माशी हा आश्चर्यकारक किटक आहे. एवढासा जीव आणि अगदी पातळ असे दोन पंख इतकाच तिचा अवतार. मात्र सेकंदात हे पंख सुमारे १२० वेळा ती हलविते आणि इतक्या वेगाने हलविते की पंख जणू अदृष्यच होतात. माशी उडण्यासाठी कोणते स्नायू वापरते यावर संशोधन केल्यानंतर ते स्नायू किवा तशी व्यवस्था या टायनी रोबोत करणे हे आव्हान होते असे सांगून ते म्हणाले की मोठे रोबो इलेक्ट्रो मॅग्नेटिक मोटरच्या सहाय्याने चालू शकतात मात्र माशीएवढ्या आकाराच्या रोबोसाठी हा पर्याय आम्हाला उपलब्ध नव्हता.
अखेर पायझो इलेक्ट्रिक अक्युएटर्सच्या सहाय्याने या रोबोचे पंख हलविणे शक्य झाले. हे एकप्रकारचे सिरॅमिक असून ते रबरासारखे ताणू शकते व आकुंचनही पावते. कार्बन फायबरच्या बॉडीत प्लॅस्टीक हिंजेसच्या सहाय्याने हे पंख जोडले गेले. मात्र हवेत थोडा जरी बदलाव आला तरी त्याचा थेट परिणाम रोबोच्या उडण्याच्या हालचालींवर होणार हे लक्षात घेऊन त्याची कंट्रोल सिस्टिम अतिशय वेगवान करावी लागली असेही रॉबर्ट यांनी सांगितले.