आयएमजी वर्ल्ड वाईड घेण्यास अंबानी उत्सुक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आयएमजी वर्ल्डवाईड ही यूएसमधील स्पोर्ट, फॅशन व्यवस्थापन संस्था विकत घेण्यास उत्सुक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही संस्था प्रायव्हेट इक्विटी फर्म फोर्स्टमन लिटिल अॅन्ड को ने विक्रीसाठी खुली असल्याचे जाहीर केले आहे. रिलायन्सची त्या संबंधी संस्थेशी बोलणी सुरू असून त्यात चांगली प्रगती असल्याचे कंपनीतील जबाबदार अधिकार्यांाकडून समजते.

या संस्थेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून त्यांना किमान ३ अब्ज डॉलर्स इतकी किंमत अपेक्षित आहे. टेनिसपटू राफेल नदाल, नोकोव जोकोविच, मारिया शारापोवा, व्हिनस विल्यम्स लिडसे व्हॉन अशा स्टार खेळाडूंनी या संस्थेचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ही संस्था आयपीएल, ऑस्ट्रेलियन ओपन, विंबल्डन यासारख्या स्पर्धांचेही व्यवस्थापन करते.

ही संस्था विकत घेणे ही आकर्षक खरेदी असून त्यासाठी आत्तापर्यंत चार पाच जणांनी रस दाखविला आहे. त्यात ब्राझील, यूके व कतार मधील उद्योजकांचा समावेश असल्याचे आयएमजीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यापूर्वी या संस्थेबरोबर २०१० साली अंबानी यांनी सहकार्य करार केला होता व त्यानुसार भारतातील फूटबॉल व बास्केटबॉल स्पर्धांचे हक्क त्यांच्याकडे आहेत. अंबानी यांचे कंपनीच्या सध्याच्या मालकांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांना ही संस्था विकत मिळण्याची संधी अधिक आहे असेही सांगितले जात आहे.