मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; दोन ठार

मुंबई- गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांची मालिका अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईहून पुण्याकडे जाणा-या मार्गावर आयआरबी कंपनीचा टँकर आणि एका ट्रकची धडक झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. अपघातातील मृत दोघेही आयआरबीचे कर्मचारी आहेत. या घटनेनंतर अन्य कर्मचा-यांनी शुक्रवारी मुंबई-पुणे मार्ग काही काळ रोखून धरला होता.

शुक्रवारी पहाटे आयआरबीचा टँकर आणि एका ट्रकची मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जोरात धडक झाली. यामध्ये आयआरबीच्या दोन कर्मचा-यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आयआरबीच्या कर्मचा-यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे रोखून धरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यासोबतच या घटनेतील मृतांची नावे अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आलेली नाहीत. पोलिसाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरु होते.