पवारांनी दिले मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत

मुंबई: लोकसभा निवडणुका कधीही होऊ शकतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या तयारीत राहावे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. एका परीने समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या पाठोपाठ पवार यांनी मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता वर्तविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पवारांच्या या वक्तव्याची माहिती दिली. पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलताना पवार यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना दिली. त्याचप्रमाणे मुदतपूर्व निवडणुकांचे संकेतही पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुका कॉंग्रेसच्या साथीने आघाडी करूनच लढणार असून राज्यातही सहयोगी पक्षाबरोबर सलोख्याचे संबध राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे; असे आदेशही पवारांनी दिले आहेत.

पवार यांनी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्व २२ लोकसभा मतदार संघांचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, प्रतिनिधी यांच्याशी विभागवार चर्चाही केली. निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारीचा प्रमुख निकष असेल; असे पिचड यांनी सांगितले.

Leave a Comment