पवारांनी घेतली आमदार खासदारांची बैठक

मुंबई दि.२७ – लोकसभेच्या निवडणूका २०१४ मध्ये होणार असे सांगितले जात असले तरी सध्याची परिस्थिती पाहता या निवडणूका नोव्हेंबर २०१३ मध्येच होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा महाराष्ट्रातील खासदार आमदारांनी निवडणूकीच्या तयारीला लागावे असा आदेश केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी सुमारे चार तास झालेल्या बैठकीत पवार बोलत होते.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी २२ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. या सर्व जागांचा आढावा घेतानाच पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेशही दिले आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. याचाच अर्थ पवारांनी आत्तापासूनच खासदारांसाठीची यादी तयार केली आहे. शनिवारी म्हणजे आज पुन्हा शरदराव लोकसभेसाठीच्या जागांचा पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेणार आहेत.

या बैठकीला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, एनसीपीचे मंत्री आणि पक्षाचे खासदार उपस्थित होते.

Leave a Comment