रेल्वच्या तत्काळ तिकिटासाठी आता टोकनची पद्धती

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) -अलिकडे रेल्वे तिकिटे मिळणे चार महिन्यापासून खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर तत्काळवर अवलंबून राहावे लागते पण तेथेही एजंटांचा गराडा असतो. म्हणून सामान्यांना तत्काळ तिकीट काढणे शक्य व्हावे तत्काळ तिकीट काढण्यासाठी येणार्‍या प्रवाशांना टोकन नंबर देण्याचे निश्चित केले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी ही माहिती दिली.हे धोरण सर्वत्रचे असल्याचे सांगण्यात आले. देशात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुुरु झाल्याचे समजते.

सध्या उन्हाळी सुट्टयांचा हंगाम असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. दररोज तत्काळमध्ये 350 ते 400 तिकीटांची विक्री होत आहे. पुणे स्पाटेशनबरोबरच पुण्यातील शंकरशेट रोड, कर्वे रोड, रविवार पेठ आणि कॅम्प आदी ठिकाणच्या आरक्षण केंद्रावर तत्काळ तिकीट काढण्यासाठी टोकन नंबरचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तत्काळ तिकीट काढण्यासाठी नागरिकांना हा नंबर घेणे सक्तीचे राहाणार असल्याने एजंटगिरीला पूर्णपणे आळा बसणार आहे. मध्य रेल्वेने सध्या पुणे विभागात हा उपक्रम सुरू केला असल्याचे सिंह यांनी सांगीतले.