एस.टी.कनिष्ठ कर्मचार्‍यांना चार हजारांची वाढ

पुणे, दि.25 (प्रतिनिधी) – एसटी कामगारांच्या चार वर्षांच्या करार कालावधीसाठी वेतनवाढीच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.पुढील महिन्यापासून नवीन पगारवाढ लागू होईल. कनिष्ठ कामगारांच्या वेतनात साडे चार हजार रुपये वाढ होणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटण्णीस हनुमंत ताटे यांनी दिली.

फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 658 कोटी रुपये वाढीच्या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये मूळ वेतनात 10 टक्के वाढ जाहीर करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना आणि एसटी कामगार संघटनांनी त्याला विरोध करुन आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. त्यानंतर कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 13 टक्के वेतनवाढ देण्यास मान्यता दिली. तसेच धुलाई भत्ता 50 रुपये, शिलाई भत्ता 250 रुपये सुती गणवेश धारकाऐवजी सर्वच गणवेशधारी कर्मचार्‍यांना देण्याचे मान्य केले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वेतनकराराचा मसुदा प्रशासनाकडून लवकरच संघटनेस देण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाल्यानंतर कामगारांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. संघटनेतर्मे मे महिन्यापासून कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळावा याकरीता प्रयत्नशील आहे, असे ताटे यांनी सांगितले.

Leave a Comment