अटतटीच्या लढतीत चेन्नईची राजस्थानवर मात

चेन्नई, दि.२३ – राजस्थान रॉयल्सच्या शेन वॉटसनने आयपीएलच्या सहाव्या मोसमातील पहिले शतक झळकावले, पण वॉटसनचे शतक त्याच्या टीमला विजय मिळवून देऊ शकले नाही. चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यात पाच विकेट आणि एक चेंडू राखून विजय मिळवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेले १८६ धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने १९ षटके आणि पाच चेंडूंत पाच विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. चेन्नईने सात सामन्यांमधील या पाचव्या विजयासह आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

चेन्नई, बंगलोर आणि हैदराबाद या तिन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण असून, चेन्नईने सर्वोत्तम नेट रनरेटसह टॉपचे स्थान मिळवले आहे. सोमवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली होती. वॉटसनने ६१ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. मात्र चेन्नईच्या संघापुढे त्याचे शतकही कामी आले नाही.

Leave a Comment