वेतनवाढीवर नाराज एसटी वर्कर्स काँग्रेस संपाच्या तयारीत

पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – एसटी महामंडळातील प्रस्तावित वेतन करारात 13 टक्के वेतनवाढ देण्यात आल्यामुळे सुमारे 75 हजार कर्मचार्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या 13 टक्के वेतनवाढीविरोधात येत्या 30 एप्रिल रोजी पंढरपूर येथे राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत संपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड यांनी दिली.

एसटी महामंडळाचा गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला वेतन करार 12 एप्रिल रोजी रात्री उशिरा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे करण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एसटी कामगारांना 13 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2016 चा वेतन करार गेले अनेक दिवस रखडलेला होता.

महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकारने 10 टक्के वेतनवाढ देण्याची तयारी दर्शवली होती. या 10 टक्के वेतनवाढीवर एसटीतील सर्वच संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना 13 टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले; परंतु आजच्या महागाईच्या जमान्यात फक्त 13 टक्के वेतनवाढ अत्यंत कमी असून, कर्मचार्‍यांना 20 टक्के वेतनवाढ द्यायला हवी, अशी मागणी आमदार छाजेड यांनी केली. या मागच्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचार्‍यांना 17.5 टक्के वेतनवाढ देण्यात आली होती, त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता असताना ती कमी का करण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment